पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऊष्णता, ढग, वायू, पाऊस, अन्न-धान्य अव्याहतपणे सुरू असते. सूर्यनारायणाची अधिसत्ता सर्वविश्वव्याप्त आहे. त्याचा अधिकार, सामर्थ्य, शक्ती, अमर्याद- अंतीम-निर्णायक आहे. या आसनामध्ये सूर्यसामर्थ्याकडे लक्ष द्यायचे आहे. या सामर्थ्याचा अल्पसा भाग प्रसाद म्हणून मिळावा हा आशीर्वाद मिळविण्यासाठी सूर्यनारायणाला नमस्कार करावयाचा आहे. पर्वतासन ॐ मरीचये नमः - ‘मरीचि' या शब्दाचा अर्थ आहे मृगजळ. वाळवंटामध्ये दूर अंतरावर पाण्याचे तळे असल्याचा भास होतो. सूर्यकिरण व उष्णता यामुळे हे मृगजळ दिसते. प्रत्यक्षात तेथे पाणी नसतेच. तहान भागविण्यासाठी मृगजळाचे दिशेने कितीही वेळ चालत राहिलात तरी पाणी मिळणार नाही. मृत्यू हमखास मिळेल. सर्वप्रकारचे मृगजळ, भास, अभास यांचे उगमस्थान सूर्यनारायणच आहे. चांगले वाईट प्रसंग, त्याची मनाला येणारी अनुभूती, श्रेयस वा प्रेयस असलेली आपली प्रतिक्रिया सर्वांचा कर्ताकरविता सूर्यनारायण आहे. तो सर्वशक्तीमान सत्ताधीश आहे. अज्ञानातून निर्माण झालेले भास- अभास - स्वप्न निर्माण करणे व नाहींसे करणे हे त्याच्या अखत्यारित मोडते. आयुष्याकडे बघण्याची आपली दृष्टी फार तोकडी आणि लहान आहे. काळ - वेळ - क्रिया बघण्याची आपल्या दृष्टीची क्षमता फारच संकुचित आहे. त्यामुळे आयुष्याच्या आपल्या कल्पना अज्ञानातून निर्माण होतात. आपली ध्येय-उद्दिष्ट कोणती? ती साध्य करण्याची अंतिम स्थिती कोणती? त्यासाठी योग्य मार्ग कोणता ? हे लक्षात न घेता बऱ्याच वेळा ज्या गोष्टी आवश्यक नाहीत त्यांची पूर्तता करण्यामध्येच आपली सर्व शक्ती खर्च होते. आयुष्य काय? कशासाठी आहे? हे उमजत नाही. जेंव्हा ते स्वानुभवातून समजते तेंव्हा फार उशीर झालेला असतो. चूक सुधारण्यासाठी आपल्याकडे अवधी फारच कमी उरलेला असतो. आयुष्यातील वेळ वाया घालवल्याची खंत अस्वस्थ करते. हे दुर्भाग्य आपल्या वाट्याला येऊ नये म्हणून या आसनामध्ये सूर्यनारायणाला नमस्कार करावयाचा आहे. आयुष्यातील अभास, अविद्या यापासून माझी सुटका कर अशी प्रार्थना करावयाची आहे. कारण हा सूर्यनारायण दुःस्वप्नाशुभनाशनाय सूर्यनमस्कार एक साधना १९०