पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डोळे बंद असूनही ट्युबलाईटचा प्रकाश केंव्हा सुरू होतो, केंव्हा बंद होतो हे तुम्हाला सहजपणे लक्षात येते. सूर्योदय व सूर्यास्त होतात म्हणून आपण दिवस, आठवडे, महिने, वर्षे अशी कालगणना करु शकतो. काळ पुढे सरकतो आहे, आपले आयुष्य सरते आहे याची जाणीव सूर्यनारायण आपल्याला देत असतो. घटी, पळे, दिवस, आठवडे महिने, वर्षे यांची गोळा बेरीज म्हणजे आयुष्य. हा वेळ वाया घालू नका. सत्कारणी लावा. वेळ वाया घालवणे म्हणजे जगण्याची संधी गमावणे. सत्कर्म करण्याचे नाकारणे. आयुष्याची लांबी कमी करणे. ही एकप्रकारे आत्महत्याच! सूर्यनारायणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. इतरांच्या सदैव उपयोगी पडण्याचा प्रयत्न करा. या आसनामध्ये कर्मयोगी सूर्यनारायणाला नमस्कार करावयाचा आहे. पुण्यकर्म आदर्श पद्धतीने करण्यासाठी त्याचेकडून प्रेरणा आणि ऊर्जा मिळावी यासाठी प्रार्थना करावयाची आहे. साष्टांगनमस्कारासन ॐ पूष्णेनमः ● पुषन् या शब्दाचा अर्थ भरण पोषण करणारा. परिपुष्ट करणारा असा आहे. धनधान्याची समृद्धी करणारा, पिकांचे, गाईंचे संरक्षण करणारा, सहाऋतूंचा निर्माण करणारा असा हा पूषण आहे. सूर्याची ऊर्जाशक्ती आपल्याला अन्न- औषध पुरविते. अन्नामुळे आपली शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढ होते. चांगले-वाईट / योग्य-अयोग्य / पाप-पुण्य यांचा विचार करण्याची क्षमता प्राप्त होते. या प्रज्ञेमुळेच योग्य तो निर्णय घेऊन आपले सर्व शारीरिक व मानसिक व्यवहार सुरू असतात. सूर्यनारायण सर्व जीवसृष्टिचे भरण पोषण करतो. निसर्गामध्ये सूर्यकिरणांमुळे उष्णता व त्यांच्या अभावामुळे थंडी हा प्रताप घडतो. आपल्या शरीरात पित्त व कफ यांचे संतुलन साधले जाते. आपल्या आरोग्याचे रक्षण केले जाते. त्याबद्दल सूर्यनारायणा बद्दलची कृतज्ञता व अन्नपदार्थांबद्दलचा आदर हा आपला स्थायीभाव असावयास हवा. भोजन करतांना हा विचार प्रामुख्याने मनामध्ये हवा. याव्यतिरिक्त विचार किंवा कृति हा सूर्यनारायणाचा पर्यायाने अन्नाचा अपमान आहे. यासाठी जेवण करतांना टी.व्ही. पाहणे, वाचन करणे, खेळणे, चिडचिड करणे, भांडणे हे सर्व टाळायला हवे. सूर्यप्रकाश, सूर्यऊर्जा, सूर्यतेज प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अहोरात्र आपले संगोपन संवर्धन करीत असते. या सूर्यनमस्कार एक साधना १८८