पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अस्तित्व संपेल. ऊर्ध्वहस्तासन करतांना या सूर्यतेजाला वंदन करावयाचे आहे. हस्तपादासन ॐ सूर्याय नमः सूर्योदय होताच विश्वातील जीवसृष्टीमध्ये चैतन्य संचारते. सर्व सजिवांची दिनचर्या सुरू होते. सूर्यनारायण सर्वांना कार्यप्रवृत्त करतो. विश्वातील चैतन्यशक्तीचा स्त्रोत / वैश्विक शक्तीचा स्त्रोत सूर्यनारायण आहे. सूर्याच्या रथाला एकच चाक आहे. त्यामुळे सूर्यरथाची गती अखंड आहे. तो थांबणे शक्य नाही. त्याचा सारथी अरूण पांगळा आहे. रथ फिरता राहणार आहे. त्याला चालायची संधी नाही. सूर्यरथ आहे पण सूर्यनारायण मात्र त्याबरोबर फिरत नाही. तो स्वतः आकाशात स्थिर राहून सूर्यरथाचे (संपूर्ण चल-अचल सृष्टीचे) संचलन करत असतो. सूर्याच्या रथाला सात घोडे आहेत. हे सात घोडे आठवड्यातील सात दिवसांचे प्रतीक आहेत. ते इंद्रधनुष्यातील सात रंगांचा, सप्तसागर, सप्तखंड तसेच आपल्या शरीरातील सप्तऊर्जाकेंद्रांचा निर्देश करणारे आहेत. या सप्तचक्रांचा रंगही वेगवेगळा आहे. सूर्यनारायणाचे कार्यसुद्धा विविध रंगी आहे. सात मूळरंगांच्या मिश्रणातून जसे असंख्य रंग तयार होतात तसेच सूर्यनारायणाचे कार्य अमर्याद आहे. त्या प्रत्येक कार्याचा प्रकार आणि पसारा अतर्क्य आहे. त्याचा हा कर्मयोग केंव्हापासून सुरू झाला आणि किती काळ चालू राहणार याचा आयाम ठरविणे आपल्या बुद्धीपलीकडचे आहे. सर्व झाडांना जमिनीतून मिळणारा जीवनरस सारखाच पण गुलाबाचे फूल एकमेव. झाडांचे प्रकार पानांचे प्रकार माणसांचा स्वभाव सर्वच अगणित अनाकलनीय आहे. प्रत्येक चलअचल वस्तूमध्ये, शारीरिक क्रिया व मानसिक प्रक्रिये मध्ये सूर्यनारायणाचे अस्तित्व आहे. 'सूर्य आत्मा जगतस्तस्थूषश्च'।. तो सर्व चराचर सृष्टीचा आत्मा आहे. प्राणतत्त्व आहे. संपूर्ण विश्वाचे संचलन करणारा आहे. म्हणूनच सर्व जीव- प्राणीपक्षी, किडेमाकुडे सूर्योदय होताच आपली दिनचर्या सुरू करतात. महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे। सूर्यनारायणाच्या कर्मयोगी प्रतिमेला या आसनामध्ये वंदन करावयाचे आहे. त्याच्याकडून शुभकार्यासाठी प्रेरणा व सामर्थ्य मिळण्यासाठी आशीर्वाद मागावयाचे आहेत. अश्वसंचालनासन सूर्यनमस्कार एक साधना १८६