पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निमंत्रणाप्रमाणे इतर ठिकाणीही व्याख्याने व प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी जात असतो. माझ्या स्वतःच्या साधनेसाठी ही प्रशिक्षणाची प्रक्रिया फारच लाभदायक आहे. व्याख्यानापूर्वी विषयाचे काहीतरी अध्ययन होते. व्याख्यान संपल्यावर श्रोत्यांचे 'शंका समाधान' करण्याचा प्रयत्न केला जातो. घरी आल्यावर हाच प्रयत्न अधिक चांगला व तर्कशुद्ध करण्यासाठी गृहपाठ सुरू होतो. या प्रत्येकवेळी सूर्यनमस्कारातील स्वयं सूचनांचा उच्चार वारंवार होतो. साधनेमध्ये या सूचना प्रत्यक्षात येण्यास मदत होते. माझी साधना अधिक समृद्ध होते. अनेक साधकांनी आलेले अनुभव व अडचणी मनमोकळेपणे मला सांगितल्या. दिलेले मार्गदर्शन स्वीकारले. त्याप्रमाणे सुधारणा केली. त्याचा (सु) परिणाम लगेच कळविला. या अध्यापन-अध्ययनातून माझे स्वत:चे प्रशिक्षण होत गेले. सूर्यनमस्कार घालतांना मी जे पाठ गिरवितो ते योग्य आहेत याची खात्री होत गेली. ही स्वयं साधना असली तरी साधकाचे संपर्कातील सर्वांनी सामुदायिक साधना करणे गरजेचे आहे हा पहिला धडा अनुभवातून शिकायला मिळाला. व्याख्यान संपल्यावर प्रश्नोत्तराचा वेळ नेहमीच अपुरा पडतो. म्हणून कार्यक्रम आटोपल्यावर सूर्यनमस्कार साधनेच्या संदर्भात सूचना मिळतात. यामध्ये माझ्यासाठी प्रमुख तीन सूचना नेहमी असतात. यातील प्रथम सूचना अ प्रशिक्षण काळात ज्या क्रमाने आपण स्नायूंचा सहभाग सूर्यनमस्कारामध्ये वाढविला तो क्रम आणि त्यामधील महत्वाच्या सूचना लक्षात राहात नाहीत. पुस्तक छापा, किमानपक्षी तक्ता तयार तो वितरीत करा. इ-मेलच्या माध्यमातून सूचना असतात तुम्ही जे सूर्यनमस्कार मार्गदर्शन करतात, शंकासमाधान करतात ते सर्वांना नेटवर उपलब्ध करून द्या. सूर्यनमस्कार ब्लॉग सुरू करा. तिसरी विचारणा किंवा सूचना असते सूर्यनमस्कार पद्धतशीरपणे शिकण्यासाठी या भागात (परदेशातसुद्धा) तुमची शाखा आहे का ? हा प्रशिक्षणवर्ग पूर्ण केलेल्या या परिसरातील साधकाचा पत्ता देता येईल का ? सूर्यनमस्कार सी.डी. तयार केलेली आहे का ? - - - या सूचना वारंवार येत असतात. मला उत्साह देतात काम करण्यास प्रवृत्त करतात. सर्वांच्या सदिच्छा व प्रेरणेमुळेच कार्यपुस्तिका लिखाणाचे काम पूर्ण होऊ शकले. त्यांच्या इतर सूचनाही लवकरच प्रत्यक्षात येतील याचा विश्वास सूर्यनमस्कार एक साधना xxi