पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभाग्य मिळाले. तेही समर्थांच्या प्रथम मठात. टाकळी येथील गोमय मारुतीच्या साक्षिने. हा आठवणींचा सुगंध चित्तमोहक आहे. तो तसाच कायम स्वरुपी राहावा ही समर्थचरणी प्रार्थना. सूर्यनमस्कार किंवा साष्टांगनमस्कार हा सूर्योपासनेमधील विकासाचा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. यामध्ये सूर्यनारायणाची शक्तीउपासना आहे. या उपासनेत कायिक व मानसिक दोन्ही उपासना तुल्यबळ आहेत. शक्ती व भक्तीचा संगम आहे. सगुणाच्या माध्यमातून निर्गुणाची अनुभूती यामध्ये घेता येते. सूर्यनमस्कार साधनेची संकल्पना आजपर्यंत प्रवाहित व वर्धिष्णू ठेवणाऱ्या आचार्य, ऋषिमुनी, साधु-संत, समाजसुधारक, मठ-मंदिर- संस्था, संप्रदाय, त्यातील प्रचारक व कार्यकर्ते या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. त्यांना प्रथम साष्टांग प्रणिपात करतो. - संदर्भग्रंथ व संकेत स्थळ सूचीमधील सर्व लेखक - प्रकाशकांचे मुद्दाम आभार मानतो. त्यांनी माझ्या सूर्यनमस्कार विचारांना चालना दिली, आधार दिला. मसुराश्रमाचे संस्थापक मा. प. पू. धर्मभास्कर मसूरकरमहाराजांचे वंशज माननीय श्री. मोरेश्वर जोशी (सध्या मुक्काम पुणे) यांनी मसुराश्रमाचे सूर्यनमस्कार प्रचार प्रसाराचे कार्य विस्ताराने सांगितले. तसेच कै. श्री. कृष्णाजी बळवंत महाबळ (गुरुजी), नासिक यांची स्वहस्ताक्षरात लिहिलेली 'माझी स्मरणी' ही दैनंदिनी त्यांचे नातू माननीय श्री. रघुनाथ प्रभाकर महाबळ (सध्या मुक्का नासिक) यांनी वाचायला दिली. त्यांचे आभार मानतो. श्री समर्थ रामदासस्वामी चतुर्थ जन्मशताब्दी महोत्सव समारंभामध्ये सुरू केलेले सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग सातत्याने आजही सुरू आहेत. त्यामध्ये अनेक साधक सहभागी झाले. यामध्ये वय वर्षे १० - १२ ते ९२ पर्यंतचे स्त्री-पुरुष, राज्यातले, इतर राज्यातले तसेच काही परदेशीसुध्दा आहेत. www.suryanamaskar.info या संकेत स्थळाच्या माध्यमातून सूर्यनमस्काराची प्रेरणा व मार्गदर्शन घेणारे असंख्य साधक आहेत. त्यातील माझ्या संपर्कात असलेले साधारण दोन हजार साधक आहेत. www.e-gurukul.net न्यूझिलंड यांनी माझी दोन दृक्-श्राव्य व्याख्याने इंटरनेटवर प्रक्षेपित केली. पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळाचा मी व्याख्याता आहे. शाळा महाविद्यालये यातून सूर्यनमस्कार व आरोग्य या विषयावर व्याख्याने देत असतो. संयोजकांच्या सूर्यनमस्कार एक साधना XX