पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यनमस्कार - व्यक्तिमत्व विकासाचा मूलाधार - सूर्यनमस्कार संपूर्ण व्यक्तिमत्व विकासाचा मूलाधार आहे. ब्रह्मकर्म आहे. नित्य उपासना विधी आहे. जीवाची निर्मिती किंवा व्यक्तीची निर्मिती हे परब्रह्माचे कार्य आहे. हे प्रत्येक कार्य सर्वार्थाने परिपूर्ण आहे. वैशिष्ट्यपूर्ण आहे. आनंददायी आहे. आपणच आपल्या मनोविकाराने ( काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, दंभ, शोक, चिंता, स्पर्धा इत्यादी) हा आनंदप्रकाश प्रदुषित करत असतो. आत अंधार आणि बाहेर सूर्यप्रकाश अशी अवस्था होते. अंतःकरणात अंधारून आल्यावर बाहेर प्रकाशदिवे प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करतो. जीवघेण्या स्पर्धेमध्ये यश व आनंद मिळविण्यासाठी सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाच्या पाठीमागे धावतो. संपूर्ण व्यक्तिमत्व विकास म्हणजे व्यक्ती - समष्टी-सृष्टी यांच्या विकासाला आधारभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक-मानसिक - बौद्धिक सर्व सुप्त व व्यक्त क्षमतांचा विकार नष्ट करणे होय. तयार केलेली मूर्ती मातीची असल्यास त्यामधील माती कमी किंवा जास्त करून तिला अपेक्षित आकार देता येतो. मातीच्या ऐवजी लोखंड किंवा लाकूड वापरता येणार नाही. ते मातीला चिकटणार नाही. एकरुप होणार नाही. लगेच गळून पडेल. व्यक्तिमूर्ती पंचमहाभूतांची तयार झालेली आहे. या पंचमहाभूतांचे संतुलन बिघडल्यास त्यांच्यामधील ऐक्य संपुष्टात येते. वर्चस्वासाठी स्पर्धा, भांडणे, युद्ध सुरू होतात. आपण आडवे होतो. आजारी पडतो. या पंचमहाभूतांचा आविष्कार शरीरामध्ये विविधतेने नटलेला आहे. त्यामधील काही महत्वाचे अलंकार आहेत- पंचकोशात्मक पिंड पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेन्द्रिय, त्रिगुण, त्रिदोष, ऊर्जाचक्र, मन, बुद्धी, अहंकार इत्यादी. यातील प्रत्येकाचे शरीरातील स्थान, रचना, गुणधर्म, कार्यपद्धती, शरीर अवयवांवर पडणारा प्रभाव, त्यांची आवड-निवड / श्रेयस-प्रेयस, त्याचप्रमाणे त्यांच्यातील असंतुलन कशामुळे होते व ते समस्थितीमध्ये आणण्यासाठी काय करणे गरजेचे आहे या सर्वांचा समग्र भाव म्हणजे व्यक्ती सर्वांगीण व्यक्तिविकासाचे हे विविध पैलू आहेत. सूर्योपासना ही तेजाची उपासना आहे. ती अग्नीची उपासना आहे. सूर्यनमस्कार एक साधना १६५