पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मान सरळ ठेवल्यामुळे हे प्राणतत्त्व मेंदुपर्यंत वर पसरते. स्नायूंचा थकवा, नाडीची वाढलेली गती लगेच सामान्य स्थितीला येते. आपल्याला आराम मिळतो. भस्त्रिका प्रकार एक अ) पूर्वतयारी - दोन्ही हात कोपरामध्ये वाकवून पंजे खांद्याच्या सरळ रेषेत घ्या. मुठी वळा. काना समोर ठेवा. कोपर शरीरालगत ठेवा. दीर्घ श्वास घ्या. दोन्ही हात डोक्यावर सरळ वर उचला. श्वास घेऊन हाताला ऊर्ध्व दिशेला ताण द्या. मान सरळ ठेवा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. पोट मोकळे ठेवा. श्वास घेऊन हाताला ऊर्ध्व दिशेला पुन्हा ताण द्या. श्वास सोडत हात खाली करा. ही कृती क्रमवार आणखी दोन वेळा करा. कृती करतांना सर्व लक्ष विशुद्ध चक्राकडे ठेवा. पार्श्वभाग मोकळा आहे हे बघा. लक्षात ठेवा - हात, खांदे, मान यामधील नसा मोकळ्या आहेत याची खात्री करून घेण्यासाठी ही कृती करायची आहे. कुठे त्रास जाणवल्यास आजचे दिवस भस्त्रिका प्रकार करू नका. विशुद्ध चक्राकडे लक्ष देऊन श्वास घेणे हा श्वसनाचा दुसरा प्रकार. याचा थोडा सराव करायचा आहे. या श्वसन प्रकारामध्ये विशुद्धचक्र व अनाहत चक्रा भोवतीचे स्नायूंना प्राणत्त्वाचा अधिक पुरवठा होतो. त्यांची लवचिकता वाढते, कार्यक्षमता वाढते. पोहण्याच्या शर्यतीमध्ये शेवटच्या टप्प्यात अटीतटीने पोहणाऱ्या स्पर्धकाचा श्वासोच्छ्वास या पध्दतीने सुरू असतो. त्याचे खांदे रुंद झालेले स्पष्ट दिसतात. शरीराला (मेरुदंडाला) ऊर्ध्व ताण द्यायचा आहे. त्यासाठी स्वाधिष्ठान चक्राचे स्नायू मोकळे ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा सर्व शरीरच वर उचलले जाईल. बहात्तर हजार नाड्या एकमेकांना छेद देत स्वाधिष्ठान चक्रातून सर्व शरीरभर पसरलेल्या आहेत. म्हणून या भागातील स्नायू मोकळे ठेऊनच शरीराला (मेरुदंडाला) ऊर्ध्व ताण देणे शक्य होते. सूर्यनमस्कार एक साधना १०३