पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तृतीय कौशल्य हे आसन करतांना शरीराचे वजन (गुरुत्वमध्य) स्वाधिष्ठान चक्रापासून जमिनीवर दोन पावलांमध्ये लंबरेषेत ठेवा. पायाच्या करंगळीजवळ तळव्याचा अंगठा ही हाताची स्थिती. टाचेला टाच व अंगठ्याला अंगठा ही पायाची स्थिती. पार्श्वभाग पायाच्या सरळ रेषेत ही शरीराची स्थिती. यानंतर ऊर्ध्वहस्तासन हस्तपादासन अश्वसंचालनासन क्रमाने करतांना श्वासाचा ताल धरून शरीराची लय साधायची आहे. आसनात डौल आणायचा आहे. खाली वाकून कपाळ गुडघ्याला टेकविणे ही या आसनांतील आदर्श स्थिती कालांतराने सिद्ध होणार आहे. त्यासाठी अधीर होऊ नका. ( सदंर्भ घ्या उत्तरार्ध, शंकासमाधान) स्नायू क्षोभ - - - - अनावश्यक व चुकीचा ताण-दाब दिल्यामुळे कमरेच्या स्नायूंमध्ये वेदना होतात. पार्श्वभाग पायाच्या सरळ स्थितीमध्ये नसल्यास गुडघ्यावर ताण पडतो. गुडघ्याचे स्नायू दुखतात. श्वास पूर्ण बाहेर न सोडता पोट आत घेतले तर पोटाच्या स्नायूंमध्ये चमक येते. सावधान रक्तदाब, हृदयरोग, मणक्याचे विकार असणाऱ्या रुग्णांनी वैद्यकीय सल्ला घेऊनच सूर्यनमस्कारास सुरुवात करावी. हे विकार असणाऱ्या साधकांनी संथगतीने झेपेल तेवढेच खाली वाकावे. शरीराला जोर झटका देऊ नये. हे आसन टाळून सूर्यनमस्कार घालता येतात. ऊर्ध्वहस्तासन झाल्यानंतर गुडघ्यात वाकून खाली बसा विश्रांती घ्या. मग पुढील आसनाकडे (अश्वसंचालनासन) वळा. फारच वेदना होत असल्यास सूर्यनमस्कार त्या दिवशी घातले नाहीत तरी चालेल. आसनामुळे पाठ दुखी सुरू झाली असल्यास दीर्घश्वसनाचा पूर्ण सराव अधिक वेळा करा. पर्वतासन हे या प्रकारच्या स्नायूदुखीवर रामबाण उतारा आहे. भस्त्रिका प्रकार दोन (अ) आणि तीन (अ) हा प्रकार करा. सूर्यनमस्कार एक साधना ९८