पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुस्तकास प्रस्तावना लिहिणे व परीक्षण करणे येवढेच महत्त्वाचे कार्य करतात. एकूण काय तर पुस्तकातील विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रस्तावना / जाहिरात याला अत्यंत महत्त्व आहे. पण हा नियम सूर्यप्रकाश किंवा सूर्योपासना याला मात्र लागू होत नाही. सूर्यकिरणांची जाहिरात करण्याची गरज नाही. ते स्वयंप्रकाशित आहेत. सूर्यनारायण प्रत्यक्ष परमेश्वर आहे. दररोज प्रत्यक्ष दर्शन देणारा, अनुभूती देणारा 'धर्मविधान' आहे. प्रकाश, तेज, अग्नी आणि प्रत्येक जीव ही सर्व सूर्यनारायणाचीच रूपे आहेत. सृष्टीमधील प्रत्येक घटक त्याच्याच रूप-गुणांचे वर्णन करतात. त्याच्याप्रमाणे वागतात. इतरांना त्याप्रमाणे वागण्याची प्रेरणा देतात. भगवान सूर्यनारायणाची पूजा अनादि कालापासून सुरू आहे. सूर्योपासनेचे असंख्य प्रकार आहेत. जप-तप-ध्यान-धारणा - पूजा-अर्चा - व्रत-वैकल्ये हा त्यामधील एक भाग आहे. त्यातून मानसिक स्वास्थ्य मिळते. मानसिक आरोग्यातून क्रमश: शारीरिक आरोग्य प्राप्त होते. त्याचा दुसरा भाग आहे सूर्यनमस्कार साधना. ही एक सर्वोत्तम साधना आहे. सूर्यनमस्कार साधनेचा परिणाम शरीर-मन-बुध्दी या तीनही स्तरावर सारख्याच प्रभावाने होतो. ती एक ब्रह्मकर्मांतर्गत नित्यकर्म (स्वयं) साधना आहे. ही साधना वेदकालापासून प्रचलित आहे. शक्ती उपासनेची ही साधना धर्मसंस्थापक सद्गुरु, ऋषि-मुनि, समाजसेवक, समाजशिक्षक आणि राजे-रजवाडे यांनी केलेली आहे. त्यांना आलेली अनुभूती आपल्यासाठी सूर्यनमस्कार संप्रेरक आहे. " सूर्यनमस्कार शक्तीउपासना आहे, अग्नी उपासना आहे, तेजोपासना आहे. सूर्यनमस्कार सरावाच्या पहिल्या दिवसापासून या साधनेची प्रचिती शरीर स्तरावर प्रकर्षाने जाणवते. मन-बुद्धी यावर होणारा हाच प्रभाव मात्र हळूहळू लक्षात येतो. या साधनेची प्रचिती आणि तिचा प्रभाव हे जाणून घेण्यासाठी सूर्यनमस्कार साधकांना आलेले प्रत्यक्ष अनुभव लक्षात घ्यावयास हवेत. त्यातील प्राचीन व आधुनिक साधकांना आलेले काही महत्वाचे अनुभव, त्यावर काहीही भाष्य न करता, आपल्या समोर ठेवतो. • न तस्याक्षिरोगो भवति । अक्ष्युपनिषद सूर्योपासना केल्याने डोळ्यांचा दृष्टीक्षय किंवा डोळ्याचे विकार होत नाहीत. सूर्यनमस्कार एक साधना -- xi