पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यवस्थापनासमोरचे पूर्णवेळचे काम होऊन बसले.
 १५.०५ कुठलाही उद्योग सुरू करणाऱ्याचा वा व्यवस्थापन करणाऱ्याचा रस तो उद्योग चालण्यात असतो.कारखाना चालला तर पगार मिळणार हे सत्य सर्वांना माहीत असते.पण व्यवस्थापन व कामगार यांच्या संबंधात सदैव संपाबंदामंदकाम,म्हणजेच कुठल्याही प्रकारे उत्पादनात घट किंवा खीळ हीच शक्तिप्रदर्शनाची साधने का असावीत?संपाला उत्तर म्हणजे टाळेबंदी म्हणजे पुन्हा काम थांबवण्याचीच गोष्ट!
 १५.०६ संप,बंद,विध्वंस,उत्पादनात खीळ या गोष्टी समाजाच्या हिताच्या नाहीत,याबद्दल सर्वांचे व राजकारणी लोकांचेही एकमत असते.मग संप का होतात?तर त्याचे सोपे उत्तर तो व्यवस्थापनावर दबाव टाकण्याचा प्रकार हेच असते.कुठल्याही मालकाला,व्यवस्थापकाला तुम्ही विचारलेत तर तो तत्परतेने सांगेल की संप हा वाईट मार्ग आहे.मग कामगारांनी त्याच्या अडचणी,अपेक्षा किंवा त्यांच्या श्रमाची किंमत वाढवून मिळवण्यासाठी काय करावे? त्यासाठी व्यवस्थापनावर दबाव कसा आणावा? घरातली गृहिणी तिच्या स्वतःच्या अपेक्षा पुऱ्या झाल्या नाहीत तर मनातला असंतोष,राग,अबोला धरणे,स्वयंपाक बिघडवणे,भांड्यांचा आवाज जास्त वाढवणे अशा मार्गाने व्यक्त करते ना? व्यवस्थापन-कामगार संबंधात सतत मतभेद,अपेक्षाभंग,गैरसमज हे होतच राहणार. कामगार त्यांचे प्रश्न समूहात्मक कृतीने सोडवणार,कारण त्यांची परिणामकारक शक्ती समूहरूपात असते,वैयक्तिक रूपात नव्हे.संप,बंद, मंदकाम यांचा हा अर्थ असतो.ती कृती प्रतीकात्मक असते.त्यामुळे होणारे नुकसान हे कामगार व मालक या दोघांचे असते.

 १५.०७ तुम्ही वर्गयुद्ध मानणारे,मालक हे शत्रूवर्गाचे असतात असे मानणारे असाल तर तुमचा मार्ग सोपा असतो.संप यशस्वी झाला तर कामगारांच्या मागण्या मान्य होऊन त्यांच्या पदरात आर्थिक फायदा पडतो.पण संप अयशस्वी झाला तर भांडवलदारांचे नुकसान म्हणजे भांडवलशाही या वर्गशत्रूचे वर्ग म्हणून नुकसान होते,अशी तत्त्वज्ञानात्मक मांडणी करता येते.कारखाना संपांनी बेजार होऊन बंद पडला तर एका मालकाबरोबर शंभर कामगार उघडे पडतात हे वास्तव कोणी लक्षात घेत नाही.वर्गयुद्ध वगैरे गोष्टी पुस्तकात स्पष्ट व सोप्या वाटतात,नको इतक्या सोप्या असतात.रोजच्या दुपारच्या भुकेची सोय प्रत्येक व्यक्तीला महत्त्वाची असते.त्याची व्यवस्था रोजच्या रोज तिला करावी लागते.कारण दुपारी भूक लागण्याची वाईट सवय त्याला व त्याच्या घरच्यांना असते.१९८२ साली सुरू झालेला गिरणी कामगारांचा संप

९० सुरवंटाचे फुलपाखरू