पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कायदेशीर दृष्टीने अजूनही चालूच असेल.खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी या म्हणीतली अटीतटीची भाषा पुढाऱ्यांना परवडते,कारण त्यांचा संबंध म्हणीच्या पहिल्या भागाशी येतो,पण हजारो लोकांचा संबंध दुसऱ्या भागाशी येतो.ते उपाशी राहतात आणि त्यांचे हाल कुत्रा खात नाही.
 १५.०८ पण मग दबावाचे साधन म्हणून पर्याय काय? असंतोष कसा व्यक्त करणार? ह्याचे जपानमधले उत्तर वेगळे आहे.जपान हा स्वयंप्रज्ञ देश आहे.त्यांच्या काही परंपरा आहेत.जपानमध्ये औद्योगिक संबंधात काही असमाधान निर्माण झाले तर कामगार संप करत नाहीत.ते काळ्या पट्टया लावून काम करतात,पण उत्पादन बंद पाडत नाहीत.जर कारखान्यात लोकांनी काळ्या पट्टया लावल्या तर व्यवस्थापकांना ते लांच्छनास्पद वाटते.ते काळी पट्टी ही मेलेल्या औद्योगिक समन्वयाची खूण मानतात.अतिरेक झालाच तर व्यवस्थापक त्यासाठी आत्महत्याही करतात.पण अन्यथा व्यवस्थापक काळ्या पट्टीचा हा निषेध,संप समजून असंतोष मिटवण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नास लागतात.औद्योगिक विवाद संपवतात,तडजोड करून प्रश्न मिटवतात.कोणत्याही परिस्थितीत मालक किंवा मजूर उत्पादन बंद पाडत नाहीत.हा आहे कन्फ्युशियन परंपरेवर आधारलेला समन्वयाचा मार्ग.

 १५.०९ पाश्चात्य विचारात संघर्ष अटळ समजून,दोन पक्ष म्हणजे विरोधक किंवा शत्रू असे मानणाऱ्या परंपरेत संप हे न्याय्य शस्त्र मानतात.विरोधातून,संघर्षातून विकास या सूत्रावर सारे चालते. त्याबरोबरच करार पाळण्याचे पावित्र्यही महत्त्वाचे मानले जाते.करार दोन्ही बाजूंनी पाळतात.नफा-नुकसान काहीही झाले तरी करार पाळतात.कामाचे तास कराराने कमीअधिक होऊ शकतात.उत्पादन कमी तर पगार कमी,उत्पादन जास्त तर पगार जास्त,मंदी आली तर कामगारसंख्येत कपात किंवा पगारात कपात,असली बंधने युनियन्स मान्य करू शकतात व असल्या अप्रिय गोष्टी पाळतात.करार न पाळण्याचे परिणाम दोन्ही बाजूंना भोगावे लागतात.कोर्ट मालकांना व युनियन्सना दंड करतात व तो भरावा लागतो.भारतात करार पाळणे कुणालाच महत्त्वाचे वाटत नाही.कामगार कायदे मुळात कामगारांना जास्त न्याय देणारे बनवून,करार या गोष्टीची किंमतच नाहीशी केलेली आहे.कारण मुळात,सरकार हे मायबाप आणि कामगार हे फक्त मागणारे अशी भूमिका कायदे करणाऱ्या लोकांच्या मनात असते.कामगार म्हणजे श्रम विकणारे ही भूमिकाच नसते.त्यामुळे सामुदायिक सौद्याचा करार कामगारांकडून अमलात आणण्याचा युनियनने प्रयत्न केलाच तर दुसरी युनियन तिथे घुसून बसण्याची शक्यता असते.मालकांच्या दृष्टीने सारे करार एकतर्फी

सुरवंटाचे फुलपाखरू ९१