पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

न्यायालयात जाऊ अशा साऱ्या अनुभवातून गेलो.समोरासमोर द्विपक्षीय करार केला तर आपण फसवले जाण्याचा,दबावाखाली सही करण्याचा प्रश्न येतो.तेव्हा तो मार्गच नको.साधा उपाय म्हणजे न्यायालयात जाण्याचा असे मलाही सुरुवातीला वाटत असे.
 १४.१५ पुढे हळुहळू हे लक्षात आले,की कायद्याची,न्याय करण्याची सारी प्रक्रिया मुळात वांझोटी आहे.त्यातून हक्क शाबीत होतात,जय-पराजय नक्की होतो,मी बरोबर की तो बरोबर हे जाहीर होते,पण काहीतरी उत्पादन,काहीतरी मूल्यवर्धन (व्हॅल्यू अॅडिशन) हा जो कुठल्याही कारखान्याचा किंवा कंपनीचा मूळ उद्देश तो मात्र साध्य होत नाही.काहीही घडवायचे असेल तर त्याला या प्रक्रियेचा उपयोग होत नाही.यात मुळात निर्मितिक्षमतेची बीजेच नाहीत.उत्पादकतेतली वाढ,उत्पादनातली वाढ ही त्यांतून प्राप्त होत नाही.कारण मुळात हे समाजवादी कायदे ज्या वर्गकलहाच्या,आहेरे-नाहीरे या वर्गगटांच्या कल्पनांवर आधारलेले आहेत,तो आधार मुळात लुटीची वाटणी अशा प्रकारचा आहे.केकची वाटणी कशी करायची असा तो विचार आहे.खायचे हिस्से ठरवण्याचा भाग आहे.केक कसा तयार करायचा,त्याचा आकार कसा वाढवायचा याचा त्यात विचार नाही.केकचा आकार सामूहिक श्रमाने वाढत असतो किंवा निदान वाढायला हवा हे त्यात बसत नाही.
 १४.१६ कायद्याने स्वयंपाक होत नाही,जेवायला वाढले जात नाही,आजाऱ्याची शुश्रूषा होत नाही,घर चालत नाही,घराची बरकत होत नाही,हा प्रत्यक्ष अनुभव आहे.याउलट,आमचे कायदे मात्र उत्पादनवाढ,उत्पादकता कायद्याने वाढेल अशा कल्पनेवर आधारलेले आहेत.

 १४.१७ अमेरिका या वर्गकलहाच्या जोखडातून १९३३ सालापर्यंत सुटलेली नव्हती.अमेरिकेजवळ नैसर्गिक साधनसंपत्ती खूप होती,पण तयार केक नव्हता.त्यांच्याही कायद्यांवर लुटीचा केक वाटण्याच्या ब्रिटिश विचारपद्धतीचे जोखड होते.ते त्यांनी १९२९ सालच्या सार्वत्रिक मंदीनंतर झुगारून दिले,तर भारतातल्या पुढाऱ्यांनी रशियन समाजवादी स्वर्गाच्या स्वप्नाच्या आधारावर त्याच सुमारास ते जोखड उचलून मानेवर स्वखुशीने चढवून घेतले! अमेरिकेत कामगारांच्या करारांना नित्याच्या व्यापारी करारांचे (कॉण्ट्रॅक्टचे) स्वरूप आहे.सरकार त्यात सहसा पडत नाही.युनियन्स जबाबदारीने वागतात आणि सामूहिक सौद्याच्या करारावर काम चालते.कामगार कठीण काळात पगारकपातही स्वीकारतात.नोकरीची शाश्वती कामाच्या शाश्वतीवर ठरते.नेमणूक-पत्रावर नाही.श्रमाचा पुरवठा हा लवचीक असतो.युनियनने किंवा

सुरवंटाचे फुलपाखरू ८५