पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

न्याय.याचा अर्थ दोन्ही बाजू बरोबर ठरण्याची शक्यताच नाही.यालाच न्याय म्हणण्याची पद्धत आहे.मानवी संबंधांतली बरीचशी महत्त्वाची क्षेत्रे कायद्याच्या पद्धतीने क्लिष्ट बनतात,संघर्षापेक्षा सहयोगाने,भांडणांपेक्षा समझौत्याने सामंजस्याने मानवी नाती जास्त चिरकालीन व टिकाऊ बनतात हा अनुभव प्रत्येकाला येत असतो.तरीही या कायद्यांची भूमिका ही अशी आहे.
 १४.१२ घर चालवण्यासाठी, संसार करण्यासाठी,मुलाबाळांचे संगोपन करण्यासाठी,लग्न करण्यासाठी कोणी हिंदू कायद्याचे पुस्तक वाचत नाही.घराच्या वाटण्या करण्याची वेळ येते किंवा घटस्फोट घेण्याची वेळ येते,पोटगी मागण्याची वेळ येते तेव्हा कायद्याची पुस्तके,वकील,कोर्ट यांच्याकडे धाव घ्यावी लागते.त्यांची गरज अशा अपवादात्मक परिस्थितीत लागते,असाच सर्वसामान्य लोकांचा अनुभव असतो.सामान्यतः कौटुंबिक कलह हे समझौत्याने,तडजोडीने,आपापसातल्या बोलण्यांनी संपवले जातात.त्यासाठी कोर्टात जाणे कमीपणाचे असे अजूनही मानले जाते.पण एकाच कारखान्यावर किंवा आस्थापनेवर जीविका अवलंबून असणाऱ्या मालक-मजूर संबंधात मात्र गृहीतक कलहाचे असून तिकडेच लोकांचा ओढा दिसतो !
 १४.१३ भारतीय परंपरेला अनुसरून या कायद्यातली सारी पहिली कलमे समझौत्याची (द्विपक्षीय करार),समन्वय (कन्सिलिएशन),लवादाची (आर्बिट्रेशन) अशी आहेत.कोणतेही प्रकरण कामगार न्यायालयात सरकारच्या निर्देशाशिवाय जाऊ शकत नाही.या कायद्यांखालील कामकाज कामगार न्यायालयातसुद्धा वकिलांच्या लुडबुडीशिवाय व्हावे असा मूळ विचार आहे.उभय पक्षांनी मान्यता दिल्याशिवाय वकील उपस्थित राहून कोणत्याही बाजूने,कामकाजात भाग घेऊ शकत नाहीत.राजकीय नेते तर मालक-मजूर संबंध हे सलोख्याचे,समन्वयाचे असावेत याबद्दल भाषणे देतात.परंतु प्रत्यक्ष व्यवहारात मात्र कन्सिलिएशन वगैरे उपचार म्हणून पाळले जातात.कन्सिलिएशन ऑफिसर किती तडजोडी घडवून आणतात व किती फेल्युअर रिपोर्ट देतात यांची आकडेवारी पाहिली तर समन्वय ही कल्पना किती तुच्छतेने पाहिली जाते ते लक्षात येईल.दोन्ही पक्षांचा खरा जोर कोर्टात जाण्याकडे असतो.कामगारांचा कुठलाही अर्ज कोर्टात जाण्यास मंत्री नकार देत नाहीत.

 १४.१४ मी व्यवस्थापक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केल्यानंतरच्या पहिल्या काळात या सर्व प्रक्रियांतून गेलो.कोर्टाच्या वाऱ्या केल्या,कंपनीच्या वतीने सुप्रीम कोर्टापर्यंत खटले लढवून पाहिले.न्यायालयात जाऊ,अनुकूल निर्णय मान्य करू किंवा त्यावर अपील करू,उच्च न्यायालयात जाऊ,सर्वोच्च

८४ सुरवंटाचे फुलपाखरू