पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यवस्थापनातल्या सर्व आधुनिक कल्पना अमेरिकन पुस्तकांतूनच उचलेल्या आहेत. फक्त त्या जपानी मुशीत घालून त्यांनी त्यांचे जपानी व्यवस्थापनपद्धतीत रूपांतर केले असे म्हटले आहे. आपल्याला यातून बरेच शिकण्यासारखे आहे.
 विनोबांना एकदा एका सभेत (१९५२) कोणीतरी असा प्रश्न विचारला की, “काय हो, नव्या घटनेप्रमाणे जवाहरलाल नेहरूंना एक मत आणि त्यांच्या चपराशालाही एक मत देण्यात नेहरूंचा काय शहाणपणा आहे?" विनोबांनी उत्तर दिले, की जवाहरलाल हे पाश्चात्य विचारात वाढलेले असले तरी त्यांची मूळ भूमिका अद्वैतवादी आहे. प्रत्येक व्यक्तीतला आत्मा एक असल्याने त्यांनी सर्व लोकांना सारखा म्हणजे दरडोई एका मताचा अधिकार दिला. एवढा सुंदर, सोपा आणि भारतीय माणसाला भावणारा व सहज समजणारा खुलासा माझ्या पाहण्यात अन्यत्र आलेला नाही.
 नेहरूंनी अद्वैतवादी श्रद्धेने वा विचाराने हा निर्णय घेतलेला असेल की काय याबद्दल माझ्या मनांत शंका आहे. ब्रिटनच्या पार्लमेंटने जे कायदे पास केले व जो मताधिकाराचा पाया घातला तो त्यांच्या विचारांप्रमाणे. भारतीय घटना ज्या लोकांनी बनवली त्यांच्यासमोर फ्रेंच, ब्रिटिश, अमेरिकन असे पाचात्य नमुने होते. तेव्हा सार्वत्रिक प्रौढ मतदान ही कल्पना परकीय विचारातून भारतात आलेली आहे. हा मुळचा पाश्चात्य विचार विनोबांनी पचायला सुलभ बनवून, भारतीय वैचारिक मूलाधाराशी या संकल्पनेचे कलम मोठ्या कुशलतेने केले.
 व्यवस्थापनशास्त्रातल्या पाचात्य संकल्पना भारतीय मुशीत ओतून, जपानी व्यवस्थापनासारखी, भारतीय व्यवस्थापनशास्त्राची भारतीय मूलाधारावर आधारित मांडणी आपण कां करू नये या विचाराने हे लिहिले आहे. त्यातला स्वतःच्या अनुभवास आला व यशस्वी वाटला तेवढाच भाग या पुस्तकाच्या उत्तरार्धात उत्तररंग म्हणून लिहिला आहे. नारदीय कीर्तनपद्धतीप्रमाणे पूर्वरंगात तत्त्वविचाराची मांडणी आणि उत्तररंगात तो विचार किंवा तेच पालुपद अनुभवाधारित गोष्टींनी आळवले आहे. खरेतर भारतीय व्यवस्थापनशास्त्राच्या नव्या विचारांची सुरुवात शेवटच्या अठराव्या प्रकरणापासून सुरू होत आहे.

माझ्या या लेखनात त्याची नुसती सुरुवात मांडलेली आहे.

दहा