पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आलेले अनुभव क्वचित कोणी व्यवस्थापकांनी लिहिलेले मला आढळले आहेत.
 व्यवस्थापनशास्त्रावर भारतीय लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांतसुद्धा भारतीय उदाहरणे, भारतीय अनुभव, केस स्टडीज' जवळ जवळ नसतात. यशस्वी भारतीय व्यवस्थापकांच्या, उद्योगपतींच्या वा व्यावसायिकांच्या मुलाखती मधून मधून नियतकालिकांतून प्रसिद्ध होतात. त्यात त्या यशस्वी व्यवस्थापकांच्याबद्दल स्तुतिपर ढोबळ विधाने केलेली असतात. त्यांतले निष्कर्ष अमेरिकन पुस्तकातल्या निष्कर्षांशी मिळतेजुळते दिसतात. त्यांत मधून मधून तोंडी लावण्यासाठी गीता, रामायण, महाभारत,चाणक्याचे अर्थशास्त्र यांच्यातली वचने ही त्यांच्या आयुष्यातली ध्येयवाक्ये होती असे सांगण्याचा प्रयत्न असतो. त्यातून वेगळ्या असा व्यवस्थापनशास्त्राचा भारतीय अनुभव मांडलेला नसतो.
 दुसऱ्या बाजूला त्यासाठी व्यवस्थापनासंबंधी प्रसिद्ध होणाऱ्या अमेरिकन मासिकांत सध्या चलनात असलेल्या व्यवस्थापनशास्त्रातल्या संकल्पना जुन्या भारतीय वाङ्मयात कशा आहेत हे सांगण्याचा आटापिटा आढळतो. जुन्या संस्कृत वाक्यांचा किंवा वाक्यांशांचा त्यासाठी वापर केला जातो. तोही मला योग्य वाटत नाही.
 अद्वैतासारखे अत्युत्तम 'दर्शन' जगाला दिलेल्या आपल्या देशात वर्ग- संघर्ष व 'अॅडवर्सरी कल्चर' या दोन द्वैताधारित गोष्टींनी साऱ्या व्यवस्थापन विचाराला जखडून टाकलेले आहे. ब्रिटिश राजकर्त्यांनी त्यांच्या देशात असलेली वर्गविग्रहाची संकल्पना त्यांच्या कायद्याच्या रूपाने भारतात आणली. त्यांचीच न्यायपद्धत आपल्याकडे राबवली. त्यातले मूळ गृहीत कृत्य 'अॅडवर्सरी कल्चर'चे किंवा समाजात निरनिराळ्या गटांतल्या सततच्या द्वंद्वस्थितीचे आहे. याउलट, भारतीय परंपरा ही सामाजिक समन्वयाची आहे. अॅडवर्सरी कल्चर या मूळ गृहीतकाचा पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे. संघर्षाऐवजी सामंजस्यावर भर देण्याची आपल्या देशात आवश्यकता असताना आपण आमच्या मुळांपासून उखडले गेलेलो आहोत, म्हणून सदैव हक्कांची व संघर्षाची भाषा वापरली जाते. चीन,जपानसारख्या पौर्वात्य देशांत सामाजिक व्यवहारात 'न्याया' पेक्षा 'सामंजस्य' ही अग्रक्रमाची गोष्ट मानतात हे लक्षात ठेवण्यासारखे आहे.

 जपानच्या 'नॅशनल पॅनॉसॉनिक'ने फिलिप्स ह्या हॉलंडमधल्या कंपनीशी तांत्रिक सहकार्याचा पहिला करार केला तेव्हा त्यांनी, 'तंत्रज्ञान सर्वस्वी तुमचे घेऊ, त्यावरचे स्वामित्वाचे पैसे पूर्ण देऊ पण व्यवस्थापनात मात्र तुमची तांत्रिक मदत आम्हाला नको' अशी भूमिका घेतली होती. ओऽहमी या व्यवस्थापनशास्त्रातल्या नामवंत जपानी वंशाच्या लेखकाने तर जपानी लोकांनी

नऊ