पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाचण्याची सवय घरच्या लोकांना झालेली होती.या पत्रिकेने मजकुराच्या निष्पक्ष सत्यतेविषयी विश्वासही निर्माण केलेला होता.मुख्य म्हणजे,एखाद्या त्रयस्थ वर्तमानपत्राप्रमाणे मी कामगारांची प्रतिकूल पत्रे,टीका व लेख हे सुद्धा छापत असे.कंपनीची बाजूच नेहेमी बरोबर,कंपनीचीच बाजू मांडायची अशी भूमिका न घेता कामगारांची गा-हाणी,प्रतिकूल मते,प्रश्न,शंका छापून त्यांची उत्तरे देऊन संवाद वाहता ठेवत होतो. 'युनिकेम' बुलेटिनमध्ये 'असत्य' छापले जाणार नाही हा विश्वास सतत बारा वर्षांत निर्माण केला होता.
 १३.०५ मंद कामाचा हा प्रकार कामगारांच्या कुठल्याही मागण्यांसाठी नसून आरजे मेहतांना, कंपनी आपल्या मुठीत आहे हा अहंकार दाखवण्याच्या भावनेतून निर्माण झालेला होता. त्यांत कामगारांच्या मागण्यांचा काही संबंध नाही हे मी सहा महिने कामगारांपर्यंत पोचवत होतो. नेहेमीप्रमाणे, बुलेटिन दरमहा लोकांच्या हातात पडत होते.ह्या निवेदनांचा चांगला परिणाम झाला.
 १३.०६ संप काळात'न काम न पगार' हे सूत्र सर्वमान्य आहे.पण मंद काम हा तसा संप नसतो. लोक थोडेफार काम करत असतात.यावर औद्योगिक संबंध कायद्यात काही औषध त्या काळात नव्हते. कायद्याची अपेक्षा अशी की मंदकाम हे वैयक्तिक गैरवर्तणुकीचे प्रकरण समजून त्यावर चौकशीचे सव्यापसव्य करून वैयक्तिक शिक्षा द्यावी.हे मुळातच चुकीचे औषध आहे.सामूहिक कृतीला सामूहिक उत्तर असायला हवे.पण ते नव्हते,म्हणून मी पगारकपातीचा मार्ग चालू केला.युनियनला हे अनपेक्षित होते.कायद्यात बसो वा न बसो,आम्ही जितके काम कमी तेवढ्या प्रमाणात पगार कापायला सुरुवात केली.तसेच,जिथे अगदी उघडउघड काम कमी होत आहे हे स्पष्ट दिसत होते तेथेच कामगारांच्या पगारात त्या प्रमाणात कपात करायला सुरुवात केली.मंद काम आंदोलनाचे चटके तिसऱ्या महिन्यापासून या कामगारांना बसू लागले.हा प्रश्न साहाजिकच घराघरात पोचला.त्याची पूर्वपीठीका माझ्या बुलेटिनने आधीच तयार केलेली होती.

 १३.०७ आरजे मेहतांच्या युनियनची कामगारांकडून जमवलेल्या पैशांचे चोख हिशेब ठेवून त्याचा योग्य वापर करण्याबद्दल ख्याती होती.युनियनने कामगारांच्या पगारात अशा कपातीमुळे येणाऱ्या तूटीपोटी त्यांना आगाऊ खर्ची म्हणून पैसे द्यायला सुरुवात केली.युनियनने साधारण दीड लाख रुपये या कामगारांत उचल म्हणून त्या काळात वाटले किंवा मेहतांनी 'युनियनच्या या युनिटमधल्या धंद्या'त गुंतवले होते. सारांश युनियनने कामगारांकडून जमवलेल्या पैशांच्या योग्य वापरावर हे आंदोलन चालू ठेवण्याचा पवित्रा घेतला व त्याचबरोबर

७२ सुरवंटाचे फुलपाखरू