पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सत्य आमच्या बाजूलाच आहे हा जबरदस्त विश्वास माझ्या मनात होता.एकाच अंतिम सत्याकडे किंवा प्रॉडक्टकडे अनेक वाटांनी जाता येते हे वैज्ञानिक सत्यही आहेच ! प्रत्यक्ष प्रामाण्याच्या परीक्षेत आम्ही सडकून आपटलो व मार खाल्ला.कारण ज्याला मी सत्य समजत होतो ते सत्यच नव्हते! कदाचित तो माझ्या डोक्यातला भ्रम असेल.बाकीच्या लोकांना सत्य माहीत असून त्यांनी एक प्रयत्न म्हणून त्याच्याकडे पाहिले असेल,खपले तर सत्य असा व्यावहारिक विचारही केला असेल.
 १२.१६ मागाहून,अनेक लोकांशी या बाबतीत चर्चा केल्यावर माझ्या लक्षात आले,की आमच्या रजिस्टर्ड' सत्याचा पायाच तकलादू होता.भारतातले बरेच नवीन संशोधन,त्याबद्दल केले जाणारे दावे जोवर कसोटीच्या दगडावर घासले जात नाहीत तोवर मजबूत असतात.पण कोणी साधा उलट प्रश्न केला,की बरेचसे दावे कोसळतात,कारण सत्याचा आधार त्यांच्यामागे नसतो.युक्लिडच्या भूमितीत तर स्पष्टच विधान आहे,की दोन सरळ रेषा जेव्हा आणि जिथे एकमेकींना छेदतात तिथेच बिंदूचे अस्तित्व सिद्ध होते.सत्याचा बिंदू विरोधाच्या कसोटीवर प्रस्थापित होत असतो.आपल्याकडचे बरेचसे संशोधन, बरेच सिद्धांत स्वयंसिद्ध विधानांचे असतात.त्या गोष्टी जेव्हा विरोधाच्या काटाने छेदल्या जातात तेव्हाच त्यांतले हीण जळून जाते व खरा भाग,जो बऱ्याच वेळा काल्पनिक असतो किंवा लवमात्र शिल्लक राहतो,तेवढेच त्यातल्या निखळ सत्याचे दर्शन होते.कार्ल पॉपरच्या म्हणण्याप्रमाणे जिथे फॉल्सिफिकेशन शक्य नसते तिथे सत्य हे गृहीतकांच्ने म्हणजे फक्त श्रद्धेचा भाग असतो.त्याला निरीक्षणाचा किंवा पुराव्याचा आधार नसतो.ती वैज्ञानिक दृष्टीने सत्य विधाने नसतात.
 १२.१७ माझ्या वैयक्तिक जीवनात मला या सत्यदर्शनाचा खूप फायदा झाला.माझ्या डोक्यातली सत्ये,माझी माहिती,त्यावरचा ठाम विश्वास,माझी घट्ट मते,माझे विचार चुकीचे असू शकतात व म्हणून योग्य मार्गाने व माहितीने,योग्य निरीक्षणाने माझे सर्व विचार पुनःपुन्हा तपासून घेतले पाहिजेत हा बोध झाला.त्यावरचा माझा विश्वास दृढावला.

 १२.१८ नित्य बदलणारे वास्तव आणि वास्तवाची कल्पना सतत तपासणे का आवश्यक आहे ते चरचरीत अनुभवाने शिकलो.नित्यनूतन विचार करत राहण्याचे महत्त्व समजून घेतले.मी ठाम भूमिका घेत नाही,एकदा घेतलेल्या भूमिकेला चिकटून राहत नाही,त्यामुळे मी बुळा आहे अशी माझ्या अनेक सहकाऱ्यांची कल्पना झाल्याचे माझ्या कानावर आलेले आहे.मी असे प्रवाद

६८ सुरवंटाचे फुलपाखरू