पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तो कायद्यातल्या तरतुदींचा,पण वैज्ञानिक दृष्टीने आमची प्रोसेस कशी व किती वेगळी आहे हे न्यायाधिशांना कसे समजावायचे याबद्दल त्यांच्याकडून फारशी मदत होत नव्हती.आपल्याकडच्या एकूण शिक्षणातच आपली शास्त्रीय प्रतिपादने सोप्या भाषेत व परिणामकारक रीत्या मांडायची कशी याचा विचार केला जात नाही.तांत्रिक शब्द व वाक्ये ठासून सांगणे वर्गात ठीक असते कारण विद्यार्थीही फारसे खोलात जायला उत्सुक नसतात,पण कोर्टात विरुद्ध पक्षाचे लोक तुमच्या प्रत्येक विधानाचा कीस काढतात व तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात.आम्ही त्यात फार कमी पडलो.ब्लँको वाइट पुऱ्या तयारीने आलेले होते.ते वादीच्या टोलबुटामाइड या प्रॉडक्टच्या अणुरचनेचे प्लास्टिकचे मॉडेलच घेऊन आले होते.संपूर्ण प्रोसेस प्रत्येक सुट्या अणूपासून सुरुवात करून त्याची रचना कशी केली जाते,जोडणी कशी होते,प्रत्येक पायरीवर त्यात फरक कसे पडतात,प्रक्रिया काय घडतात,कोणते अणु जोडले जातात, कुठले काटले जातात,कोणते बदलतात व शेवटी टोल्बुटामाइड हे प्रॉडक्ट कसे तयार होते हे त्यांनी टेक्स्टच्या पद्धतीने प्रात्यक्षिकाच्या रूपाने,प्लास्टिकच्या मॉडेलच्या साहाय्याने करून दाखवले व आमच्या प्रोसेसमध्ये त्यात किती थातुरमातुर बदल करून तोच परिणाम घडवला जातो हे त्यांनी भर कोर्टात सोप्या शब्दांत,थोडक्यात व दृश्य रूपात सिद्ध केले.हाफकिनची प्रोसेस म्हणजे काही अणू सुरुवातीला जोडून मग काढून टाकण्याचा आहे हे त्यांनी सिद्ध केले.आमचे शास्त्रज्ञ त्यांच्या प्रयोगावर एकही शंका काढू शकले नाहीत.त्यांच्या तांत्रिक मांडणीला आमचे शास्त्रज्ञ एक केसभरही हलवू शकले नाहीत.हाफकिनची प्रोसेस ही ह्येक्स्टच्या प्रोसेसची नक्कल आहे हे सत्य ब्लँको वाइटने सोप्या,सरळ पद्धतीने कोर्टासमोर मांडले.तेव्हा सत्याचे दुसरे दर्शन मला भर हायकोर्टात १९६८ साली झाले.आमची बाजू खरोखरी सत्यावर उभीच नव्हती.आमची कुबडी पंजीकृत कागदाची म्हणजे पेटेंटची होती.त्यावर सरकारी शिक्का होता. प्रत्यक्षात प्रोसेस टेक्स्टचा होता व खरा होता.सत्याचे असे उघडेनागडे दर्शन,हा मला वेगळा,दिपवून टाकणारा चमत्कार होता.'युनिकेम'तो खटला हरली हे सांगायलाच नको.
 १२.१५ विष्णूच्या चौकशीत झालेले सत्याचे दर्शन व आलेला अनुभव आणि टोलबुटामाइडच्या खटल्यातले सत्याचे दर्शन व अनुभव ही दोन्ही दर्शने वा अनुभव मी वैयक्तिक पातळीवर घेतली किंवा अनुभवली.ती दर्शने सत्याला स्वत:चे बळ असते,स्वतःचे खंबीर पाय असतात,ही खूणगाठ पुरवण्यास

समर्थ होती.टोलबुटामाइडसाठी मेहेनत घेतली होती.खूप चर्चा केल्या होत्या.

सुरवंटाचे फुलपाखरू ६७