पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लगेच गुन्हा कबूल केला आणि चांगली नोकरी गमावली.विष्णूसारख्या बावळट माणसाचे सत्य एवढे बळकट व मजबूत होते की त्याच्यासमोर सारे काही दुबळे ठरले.
 १२.०९ मी माझ्या डोळ्यांसमोर सत्याचा हा उघड आविष्कार झालेला पाहिला आहे.इतकी वर्षे झाली तरी आजही बावळट विष्णूच्या सत्याचा आविष्कार आणि रगेल कामगाराचे ढेपाळलेपण माझ्या डोळ्यांसमोर स्पष्ट आहे.त्या मूळ सत्याचा अनुभव पुढे अनेक वेळा आला.सत्य हे स्वयंभू व स्व-तंत्र असते याबद्दल त्यानंतर माझ्या मनात शंका निर्माण झाली नाही.त्यावेळी मी सत्याच्या पक्षात होतो.
 १२.१० याच आविष्काराची दुसरी बाजूही मी पुढे अनुभवली.
 १२.११ मधुमेहावर इंन्शुलिनची रोज इंजेक्शने घेणे हाच उपाय त्या काळी असे.रोज आणि घरच्याघरी इंजेक्शने घेणे हा मोठा तापदायक प्रकार असे.होक्स्ट व फायजर या दोन कंपन्यांनी टोल्बुटामाइड हे गोळ्यांच्या स्वरूपात म्हणजे तोंडाने घ्यायचे औषध १९६० च्या सुमारास बाजारात आणले.त्याचे मूळ पेटंट टेक्स्टचे होते.ते औषध महाग होते.त्याला खूप मागणी होती.युनिकेम कंपनीने हाफकिन ह्या सरकारी संस्थेने पेटेंट घेतलेले टोल्बुटामाइड बाजारात आणले.ह्येक्स्टच्या दाव्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने घेतलेले पेटेंट अ-वैध होते.म्हणून त्यांनी युनिकेम व महाराष्ट्र सरकार यांच्याविरुद्ध मुंबईच्या हायकोर्टात दावा गुदरला.भारतात ह्येक्स्ट व फायजर या दोन कंपन्यांनी ते बाजारात आणले होते.युनिकेमच्या स्वस्त किंमतीमुळे त्या कंपन्यांना बाजारातली स्पर्धा महाग पडत होती.ज्या पेटेंट अधिकाऱ्यांनी ह्येक्स्टचे पेटेंट दिले होते त्यांनीच हाफकिनच्या प्रोसेसला महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या नावे पेटेंट दिले होते.आमची औषध बनवायची पद्धत (प्रोसेस) ही ह्येक्स्टच्या पद्धतीपेक्षा वेगळी आहे असा आमचा दावा होता.ज्या पायावर म्हणजे सुरुवातीच्या घटकद्रव्यावर आमच्या पद्धतीची सुरुवात आधारलेली होती ती टेक्स्टच्यासारखीच होती व त्याचे अंतिम उत्पादन (प्रॉडक्ट) एकच म्हणजे टोल्बुटामाइड आहे हे आम्हाला मान्य होते,पण २००५ सालापूर्वी भारतीय कायद्याप्रमाणे औषधे व अन्न या क्षेत्रात 'प्रोसेस' पेटेंट दिले जात असे व 'प्रॉडक्ट' पेटेंट दिले जात नसे.आमच्याजवळ सरकारी पेटेंट होते म्हणून आम्ही कायद्याचा भंग केलेला नाही असा आमचा दावा होता.हे आमचे 'सत्य' होते.

 १२.१२ पेटेंट पंजीकृत असले तरी त्याला हायकोर्टात आव्हान देता येते व ते तसे होक्स्टने दिले होते आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या नावे दिलेले

सुरवंटाचे फुलपाखरू ६५