पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आरोपीने म्हणजे त्याच माणसाने त्याला मारले हे सिद्ध होणे आवश्यक होते.संपाचे वातावरण असल्याने दुसरा कोणी प्रत्यक्ष हजर असणारा साक्षीदार नव्हता.एकाच ठिकाणी काम करत असल्याने ओळख पटवण्याचा मुद्दा नव्हता.विष्णू खरे बोलत होता याबद्दल मला खात्री वाटत होती.विष्णूची बौद्धिक क्षमता गोष्ट रचून सांगण्याएवढी नव्हती.पण उलटतपासणीत तो कसा टिकाव धरील याबद्दल माझ्याही मनात शंका होती.आरोपी कामगाराला तर विष्णू कस्पटाप्रमाणे वाटत होता.त्याचा आविर्भावही तसाच होता.विष्णूला सत्याशिवाय कसलाच आधार नव्हता.
 १२.०७ आरोपी कामगाराने विष्णूची उलटतपासणी सुरू केली.त्यांचा जो संवाद चालला होता तसा तो मी लिहून घेत होतो.माझ्या यथामूल लिहिण्याच्याबद्दल कोणाचीही तक्रार नव्हती,कारण अशाच आणखी पस्तीस जणांच्या इतर चौकश्या मी चालवत होतो.युनियनचीही तक्रार नव्हती,पुढे कोर्टातही ते सर्व कागदपत्र मान्य झाले.अगदी 'मॅनेजमेंटचा कुत्रा','मराठी माणूस असूनही गुजराती मालकांची बाजू घेणारा' अशा साऱ्या आरोपांचा धनी असूनही मी लिहिलेल्या जाबजबाबांविषयी सर्वांचा विश्वास होता.

 १२.०८ उलटतपासणीत प्राथमिक सवाल-जबाब झाले.कुठल्या गाडीतून उतरलास, कुठल्या वेळी उतरलास, कुठे मारले-कसे मारले याबद्दल आरोपीने विष्णूला उलटसुलट खूप प्रश्न विचारले. विष्णूने मूळ जबानीप्रमाणे उत्तरे दिली.आरोपीने अगदी दबकावून विष्णूची चेष्टा करत असल्यासारखे प्रश्न विचारले.विष्णू घाबरून कापतच बोलत होता.पण तो मूळ तक्रारीपासून ढळत नव्हता.शेवटचा वर्मी प्रश्न म्हणून आरोपीने विष्णूला विचारले,"विष्ण्या, मी तुका टेशनवर तोंडात मारलंय म्हणून तुजे दांत फुटोन रकात इला म्हणतंस,तर तुज्या थोबाडावर जखमेची खून खय दिसत नाय.ह्यां कसा रे?"(विष्ण्या मी तुला स्टेशनवर तोंडात मारले म्हणून तुझे दांत फुटून रक्त आले म्हणतोस,तर तुझ्या थोबाडावर जखमेची खूण कुठे दिसत नाही. हे कसे रे?") त्याने विष्णूला चारीमुंड्या चीतपट केल्याच्या आविर्भावात प्रश्न केला. विष्णूच्या चेहऱ्यावर जखमेची खूण दिसत नव्हती हे स्पष्ट होते.विष्णू खोटा ठरणार असे मलाही वाटले,पण विष्णूचे उत्तर असे होते.“मेल्या, माझ्या थोबाडीत दणको मारलंस,माजे दात भुतुरसून गालात घुसोन रगात इले तर त्येची खून भायर कशी दिसात?"(मेल्या, माझ्या थोबाडीत दणका मारलास, माझे दात आतून गालात घुसून रक्त आले तर त्याची खूण बाहेर कशी दिसेल?") त्याने तोंड उघडून आतला व्रण दाखवला आणि तो आरोपी माझ्या डोळ्यांसमोर अक्षरशः ढेपाळला.त्याने

६४ सुरवंटाचे फुलपाखरू