पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १२.०३ व्यक्तीवर लोक विश्वास केव्हा ठेवतात याचे उत्तर सोपे आहे.ती शब्द पाळत असेल तर!सांगितला जाईल तो माल,सांगितल्या वेळी,सांगितल्या किंमतीत,सातत्याने पुरवला गेला तरच लोकांचा विश्वास निर्माण होतो.माणूस खरा आहे की खोटा आहे हे अशिक्षित माणूसही आंतरिक प्रेरणेने ओळखतो.व्यक्तीचा खोटा मुखवटा केव्हा गळून पडतो हे व्यक्तीला कळतही नाही.खोटे हसणे,खोटी आश्वासने लोकांच्या सहज ध्यानात येतात.ती जन्मजात देणगी प्रत्येक माणसाला असते.
 १२.०४ मी माझ्या आयुष्यात या गोष्टीचा अनुभव अनेक वेळा घेतलेला आहे.सत्याचे पाय खंबीर असतात.ते आपल्या पायावर उभे राहते.खोटे बोलणाऱ्याला सतत सतर्क व सावध राहून,बोललेल्या गोष्टींचे स्मरण करत,तारेवरची कसरत करत जगावे लागते.त्यातून मानसिक ताण आपोआप निर्माण होत असतो.१९६५ सालची गोष्ट आहे.मी कंपनीत नवीनच कामाला लागलो होतो.कंपनीतल्या संपाला पस्तीस दिवस होऊन गेले होते.संप करणाऱ्या कामगारांना संपातली निरर्थकता हळुहळू ध्यानात येऊ लागली होती.लोक कामावर परतायला सुरुवात झाली होती.विष्णू म्हणून एक कामगार कामावर येण्यासाठी जोगेश्वरी स्टेशनवर उतरल्यावर त्याच्यापेक्षा दणकट व मुजोर अशा एका पुढारी कामगाराने त्याला अडवले.त्याने संप फोडणारा म्हणून त्याला दोन गुद्दे लगावून त्याचे तोंड फोडले.त्याचे दात पडून त्याचा चेहरा रक्तबंबाळ झाला हे मी पाहिलेले होते.तो तसाच कारखान्यात आला.काही दिवसांनी,कंपनीने त्या मार देणाऱ्या कामगाराला चार्जशीट दिला.मी त्यात चौकशी अधिकारी नेमला गेलो होतो.
 १२.०५ चौकशी सुरू झाल्यावर,मी विष्णूचे निवेदन रीतसर लिहून घेतले.मारणारा कामगार चौकशीच्या वेळी हजर होता.मी सारे जाबजबाब जसे सांगितले जात होते तसे माझ्या हस्ताक्षरात लिहून घेत होतो.बाकी सह्या वगैरे सारे सोपस्कार विधिवत् चालले होते.विष्णूने त्याच्या तोंडी जबानीत जशी तक्रार केली होती तशीच सर्व माहिती सांगितली.त्याला त्याच कामगाराने स्टेशनवर कशी थोबाडीत मारली,त्यामुळे दात ओठात घुसून रक्त कसे आले हे सारे सांगितले.विष्णू हा साधा व बावळट समजला जाणारा अशिक्षित कामगार होता.ज्याच्यावर चार्जशीट होती तो कामगार जास्त बळकट,तरणा,शिकलासवरलेला,पुढारीपणा व टगेगिरी करणारा म्हणून प्रसिद्ध होता.त्याच्या उलटतपासणीत विष्णूची सहज भंबेरी उडणार असे वातावरण होते.

 १२.०६ विष्णूने रक्त येईपर्यंत मार खाल्ला होता ही गोष्ट खरी होती,पण

सुरवंटाचे फुलपाखरू ६३