पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अजूनही भारायला होते.बर्नार्ड शॉ हाही एक घटक त्यात होताच.प्रा. अ.भि.शहांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांनी मनुस्मृती जाळली.त्यामुळे मी प्रथम मी मनुस्मृतीचा संस्कृत-मराठी अनुवाद वाचला.संस्कृत शिकलेला नसल्याने इंग्रजी भाषांतर (१८८४ सालचे) वाचले.भिक्षुकीच्या परंपरेने पढिक संस्कृत तसे रक्तात भिनलेले आहे.पण शास्त्रकाट्याच्या तराजूत तपासलेले नव्हे.संस्कृतवरचे प्रेम आतले,पण अभ्यास नाही.
 ११.१५ अमेरिकन मॅनेजमेंटची अनेक पुस्तके,मासिके,सेमिनार,अभ्यासवर्ग झाले.काही मी स्वतः ही घेतले.पण अमेरिकेतल्या स्थितीविषयी मला प्रत्यक्ष अनुभव नाही.माझ्या या लिखाणाला या साऱ्यांचा आधार आहे,पण जेवढे पचले तेवढेच लिहायचे असा दंडक माझा मी हे लिहिताना घालून घेतलेला आहे.
 ११.१५ मी समता हे मूल्य मानवी संबंधांत महत्त्वाचे मानतो.ते मला पुस्तकांनी शिकवलेले नाही.ते मी राजापूरच्या मातीतून घेतलेले आहे.पुस्तकांनी त्याला उजाळा दिला.त्या लाल मातीइतकेच ते मला चिकटलेले आहे.त्यामुळे कुणाही मोठ्या माणसाशी बोलताना मला कधी अडचण वाटली नाही, दबाव वाटला नाही.मीही कधी माझ्याबद्दल दबदबा वाटावा असे वागलो नाही.सगळ्यांशी बरोबरीच्या पातळीवर वागत आलो.आजही जेव्हा मी माझ्या देवाच्या गोठण्याच्या घरी जातो तेव्हा माझ्या साऱ्या उपाधी गळून पडतात.खरे तर,तिथे मी फक्त पहिली सोळा वर्षे होतो.पुढचे सारे आयुष्य मुंबईच्या महानगरीत गेले.पण गावच्या लोकांच्या दृष्टीने मी अजूनही नाना उपाध्यांचा आणि अन्नपूर्णावहिनींचा मुलगा वसंताच आहे.तिथल्या लोकांच्या मनात मी त्यांच्यापेक्षा वेगळा आहे,शिकलेला आहे,बऱ्या परिस्थितीतला आहे याचा कोणताही संस्कार नसतो.त्यामुळे तिथे राहताना मी मोकळेपणाने राहू शकतो.मी तेथे मालक नसतो किंवा मजूर नसतो.हॉटेलमधले गि-हाईकही नसतो.मी फक्त मी असतो.समाजव्यवहारातली ही समानता मी माझ्या गावातल्या मातीतून मिळवलेली आहे.मी तीच जीवनश्रद्धा टिकवून आहे.

 ११.१६ ज्ञानी माणसांपुढे,वडिलधाऱ्यांसमोर किंवा साध्यासुध्या निरलस कार्यकर्त्यासमोर वाकायला मला संकोच वाटलेला नाही.पण बाकी कुणासमोर वाकणे मला कठीण जाते.त्यामुळे वैयक्तिक नुकसानही करून घेतले आहे.बरोबरीच्या,समानतेच्या नात्याने व पातळीवरून काम करायची किमया मी साध्य केली आहे असे मला वाटते.ही गोष्ट फार थोड्यांना साधते हेही मी पाहिले आहे.

सुरवंटाचे फुलपाखरू ५९