पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ११.१७ राजापूरच्या मातीतल्या समानतेच्या गुणामुळे कुठल्याही गोष्टीमुळे किंवा व्यक्तीमुळे मी फारसा कधी भारावून गेल्याचे आठवत नाही.मी मोठ्यामोठ्यांचे मातीचे पाय पाहिले आहेत.मी 'सिनिक' होण्याचे मात्र टाळत आलो आहे.कारण एकदा हा सिनिसिझम अंगात शिरला की मग कोणतेही उत्पादक काम माणसाच्या हातून होत नाही. त्याच्या साऱ्या वागणुकीला अकर्तृत्वाचा कुबट वास येऊ लागतो. राजकारणातल्या अनेक लोकांचे हे अनुत्पादकत्व मला नेहमी खटकते.महाराष्ट्रातल्या अनेक बुद्धिमंतांचा, लेखकांचा,विचारवंतांचा अनुत्पादकपणा माझ्या मनात खंत निर्माण करतो.त्यांतल्या बऱ्याच जणांचे लेखन मला वांझोटे थयथयाट वाटतात.कारखाने काढून उत्पादन करणारा,वाढवणारा कमी महत्त्वाचा ठरतो आणि त्यांना संपावर नेऊन वाऱ्यावर सोडणारा हिरो होतो,ही माझ्या दृष्टीने मोठी चूक वाटते.
 ११.१८ नेणत्या कर्मनिष्ठांचा बुद्धिभेद करू नये हे मला मनोमन पटलेले आहे.जिथे मतभेद झाले तिथे मी संस्था सोडली,पण त्या संस्थेविरुद्ध बोललो नाही.कोणतीही विरुध्द अनुत्पादक चाल केली नाही. सदैव उत्पादनसमर्थक राहिलो.'मॅनेजमेंटचा कुत्रा' हे दूषण मानले नाही.मॅनेजमेंटही उत्पादनप्रवण राहील हे पाहिले.जेव्हा तिथला रंग बदलला तेव्हा संस्था सोडून,वानप्रस्थाश्रमात जाऊन स्वयंप्रेरणेने स्वेच्छानिवृत्ती घेतली.
 ११.१९ भाकरी निर्माण करण्याचे प्रयत्न मला मोलाचे वाटतात.समानता हवी,न्याय्य वाटणी व्हावी,कारण आपण सारे एकाच सूत्राने जोडले गेलेले आहोत.हे गृहीतक सामाजिक दृष्ट्या मोलाचे असते,पण ते भाकरी निर्माण झाल्यावर हा माझ्या चिंतनाचा विषय आहे.अनेक माणसांशी संबंध आल्यामुळे संघर्षापेक्षा वाटाघाटींमुळे,तोडग्यांमुळे वेगवेगळ्या पैलूंचा विचार सहज होऊन गेला.
 ११.२० ज्याला काम नाही त्याला किंमत नाही हे सत्य मला मनोमन पटलेले आहे.व्यक्तीचे काम त्या व्यक्तीचे सामाजिक मोल ठरवत असते.मी जगावे किंवा जेवावे ही माझी गरज आहे,समाजाची नव्हे.ती माझी जबाबदारी आहे, समाजाची नव्हे.मी समाजाचा ऋणी आहे,समाज माझे देणे लागत नाही, समाजाला माझी गरज नाही,मला माझ्या जगण्यासाठी समाजाची गरज आहे हे मला पटलेले आहे.

 ११.२१ अनेक लोकांना नोकरी हवी असते पण काम हवे असतेच असे नाही.भारतातल्या शहरी समाजात सतत नोकऱ्यांची किंवा जॉबची वार्ता होते,कामाची होत नाही.काम करणारे बेकार राहत नाहीत.नोकऱ्यांचा दुष्काळ

६० सुरवंटाचे फुलपाखरू