पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रा. शि. ल. खोतांच्या गुरुमंत्राप्रमाणे ललित साहित्यात 'फक्त आत्मचरित्रे वाच,ती ललित साहित्यापेक्षा जास्त खरी असतात' हे पण पाहिले.सुदैवाने,आत्मचरित्रे विकत घेण्याची ऐपत होती.म्हणून ग्रंथसंग्रहही झाला.
 ११.११ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार थोडाफार राजापूरच्या संघस्थानावरचा,शाळेत असतानाचा.त्यानंतर एकदम नोकरीच्या काळात संघपरिवारातल्या समाजसेवी स्वयंसेवी संस्थांचा परिचय १९७० नंतरचा.त्याशिवाय समाजवादी व खास करून सर्वोदयी स्वयंसेवी संस्थांचा परिचयही त्याच काळातला.हे सारे संपर्क कंपनीतल्या अधिकारस्थानामुळे,देणगी देण्याच्या क्षमतेमधून झालेले.संघाकडे ओढा जास्त होता.
 ११.१२ बाँड रसेलचे 'पॉवर' हे पुस्तक परिणाम करून गेले.बऱ्याचशा सामाजिक गोष्टी समजल्या त्या त्यामुळे.मानवी संबंधांसंबधीचे ते एक अजब पुस्तक आहे.दोनपेक्षा जास्त माणसे जिथे एकत्र येतात तिथे सत्तालालसेचा प्रश्न अपरिहार्यपणे येतो.त्यामुळे आयुष्यातल्या बऱ्याच अनुभवांचा अर्थ लागला.दुसरी पुस्तके एडवर्ड डी बोनोची.त्यांनी तर माझ्या विचार करण्याच्या पद्धतीची पाळेमुळेच हादरवली.तार्किक पद्धतीने विचार करणे ही विचार करण्याची एक पद्धत आहे.ती एकमेव नव्हे,हे फार जाणवले.१९७४ साली सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंगचा एका आठवड्याचा अभ्यासवर्गही असाच ध्यानांत राहणारा ठरला.
 ११.१३ १९६६ ते १९९० अशी तेवीस वर्षे 'युनिकेम'चे हाउस बुलेटिन चालवले एक प्रकारे विचारप्रसाराचा हा दीर्घकालीन प्रयत्न होता.कामगारांनी कसा विचार करावा हे सांगत राहिलो,पण माझाच विचार माना असे चुकूनही म्हटले नाही.माझे म्हणणे योग्य आहे हे जरूर म्हटले पण माझेच म्हणणे बरोबर आहे असा आग्रह धरला नाही.कृतीचे स्वातंत्र्य वाचकांवर सोडले होते.त्यामुळे मोकळा राहिलो, लिहिता राहिलो.त्यामुळे विचार करायची,विचार मांडायची सवय राहिली.व्याख्यानेही बरीच दिली.दरवेळी पूर्वतयारीशिवाय व समोरच्या श्रोत्यांकडे पाहून बोलताबोलतानाच विचार करायची सवय लागून गेली. श्रोत्यांकडे पाहून बोलल्यामुळे श्रोत्यांच्या प्रतिसादातून सतत शिकत आलो.

 ११.१४ पहिल्यापासून काही वाचले किंवा ऐकले की आपल्या अनुभवाशी ते पडताळून पाहायचे आणि पटले तर स्वीकारायचे ही पद्धत राखली.हा ज्ञानसंपादनाचा मुख्य मार्ग आहे.सारखा पुनर्विचार करत राहिलो.त्यामुळे नित्यनूतनत्व राखणे सहज सोपे गेले.विनोबांच्या अप्रतिहत तर्कशक्तीने तर

५८ सुरवंटाचे फुलपाखरू