पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निरनिराळ्या समूहांशी काम करण्याचा अनुभव आला.खूप शिकायला मिळाले.संस्थापक चेअरमन पद्मभूषण अमृत विठ्ठलदास मोदी यांच्यामुळे सतत वाचता राहिलो.सतत शिकत राहिलो.कंपनीचा प्रतिनिधी म्हणून सुप्रीम कोर्टापर्यंतची सर्व कोर्ट,सरकारी समित्या,कारखानदारांच्या संघटना,सरकारी कायद्यांना आव्हान देणारा अर्जदार,पब्लिक इंटरेस्टच्या नावावर आंतर्राष्ट्रीय फंडांवर जगणाऱ्या संस्था यांच्याशी झगड़े करण्याचा अनुभव मिळाला.या साऱ्या कामांमुळे सतत नवीन विचार करावा लागला.अनेक लोकांची खरी ओळख पटण्याचा अनुभव गाठीशी लागला.मी सदैव सरव्यवस्थापक म्हणूनच वावरलो.माझा कंपनीतला हुद्दा पहिल्यापासून शेवटपर्यंत कंपनी सेक्रेटरी असाच राहिला.हुद्दा आणि प्रत्यक्ष काम यांचा बऱ्याच वेळा दूरान्वयानेही संबंध नसतो हे वैयक्तिक पातळीवर अनुभवले.
 ११.०८ हजार बाराशे माणसांशी रोजचा वैयक्तिक संपर्क,दोन ठिकाणच्या कारखान्यातले व देशभर पसरलेले तीनशे विक्रीप्रतिनिधी असा साधारण दीड हजार माणसांच्या मालक-मजूर संबंधित प्रश्नांशी संबंध आला.त्यांत संप,मंद काम,मारामाऱ्या,धमक्या,युनियन्समधली सुंदोपसुंदी हे सारे अनुभवले.केमिस्ट व व्यापारी लोक यांच्या युनियन्स व त्यांतले ताणतणाव पाहायला मिळाले.जवळजवळ दीडशे मॅनेजर्सची वागण्याची पद्धत,आंतरिक संबंध,ताणतणाव अनुभवायला मिळाले.
 ११.०९ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, सरकारमधले निरनिराळ्या पातळीवरचे प्रतिनिधी,मंत्री-त्यांचे भगत व अडत्ये,सार्वजनिक सेवाभावी संस्थांमधले कार्यकर्ते,पगारी कामगार,ट्रस्टी अशी निरनिराळ्या थरांतली माणसे पाहायला मिळाली.दसऱ्या कंपन्यांतले अधिकारी व त्यांच्या वागणुकीचे नमुनेही पाहायला मिळाले.

 ११.१० सारांश १९५० पासून २००७ सालापर्यंत सतत सत्तावन वर्षे माणसे,माणसांची वागणूक, माणसामाणसांमधले संबंध यांचा भरपूर अनुभव गाठीशी आला.वृत्तपत्रे,मासिके,पुस्तके वाचतच होतो. १९५१ सालापासून विनोबांविषयी वाचत होतो.त्यांच्या भूदानाच्या चळवळीमुळे मार्क्सच्या पोथीत अडकलो नाही.विनोबांच्या वाङमयावर विचारपोषण झाले.कोणीच 'नाही रे' (हॅव-नॉट) नसतो हे समजले व पटले.माझा प्रत्यक्ष अनुभव वर्गविग्रहाचा नव्हताच.अखेर,तुमची अनुभूती ही वैयक्तिक असते.वर्ग,वर्ण, जात,धर्म,समाज,राज्य या साऱ्या परोक्ष किंवा अनुमानाच्या गोष्टी असतात.प्रादेशिक मराठी ललित साहित्यातून आजुबाजूच्या जगाचे ज्ञान होत होते.

सुरवंटाचे फुलपाखरू ५७