पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खात्यात चालत असे.त्यासाठी भरती झालेल्यांत मी एक होतो. म्हणजेच राष्ट्रीयीकरणाने माझी नोकरी निर्माण झाली होती.तिथे सरकारी आस्थापने कामे कशी करतात ते समजले.तिथे मी मराठी वाङमय मंडळ स्थापन करण्याचा प्रयत्न केला.वरिष्ठ अधिकाऱ्यांना परवानगी विचारायला गेलो,तर त्यांना युनियन स्थापन करण्याचा हा छुपा प्रयत्न असावा असा संशय आला असावा.त्यांनी परवानगी नाकारली.पुढे त्याच कॉर्पोरेशनच्या उच्चाधिकाऱ्यांच्याही युनियन्स झाल्या,पण ती नंतरची गोष्ट.त्या साऱ्यांनी यथावकाश संप वगैरेही केले.पण मी ही १९५९-६० सालची गोष्ट सांगत आहे.माझ्या दृष्टीने,शाळेतले समांतर गॅदरिंग, कॉलेजमधले मराठी-गुजराती मंडळ ह्याचीच नोकरीच्या ठिकाणी मराठी मंडळ स्थापन करणे ही पुढची पायरी होती.युनियनबाजीचा उगाच आरोप मात्र झाला.पुढे मी ती नोकरी सोडली.
 ११.०६ त्यानंतर मी सिडनहॅम कॉलेजात शिकवायची नोकरी पकडली.तिथे पाच वर्षे खूप आनंदात काढल्यावर, पगारात भागत नाही म्हणून,खासगी क्षेत्रात नोकरीचा विचार सुरू केला.तेव्हाच सरकारी महाविद्यालयांतल्या प्राध्यापकांची म्हणजे सनदी राजपत्रित अधिकाऱ्यांची अनौपचारिक संघटना होऊ घातली होती.तेव्हाची कल्पना अशी होती,की सर्वांनी,वैयक्तिक रीत्या पगार वाढवून मिळावा अशी छापील मागणी करायची होती.सामूहिक मागणी म्हणजे बंडाचा प्रकार (म्युटिनी) मानला गेला असता. त्यात मीही सही केल्याचे आठवते.सरकारी नोकरांच्या युनियन्स,त्यांचे संप हे प्रकार सुरू झाले,पण ते १९६४ सालानंतर.मी सिडनहॅममधली नोकरी सोडून युनिकेम.या खासगी क्षेत्रातल्या कंपनीच्या औषध कारखान्यात १९६४ साली कामाला सुरुवात केली.सारांश असा, की नोकरीत अनेक वर्षे राहूनही मी कधी युनियनचा सभासद झालो नाही.तेव्हा कामगार म्हणून काय मनोभूमिका असते त्याचा मला वैयक्तिक अनुभव नाही.

 ११.०७ मी युनिकेम कंपनीचा सर्वोच्च श्रेणीतला अधिकारी १९६४ सालापासून झालो व आपोआप 'मॅनेजमेंटचा कुत्रा' वगैरे झालो.सतत 'आहे रे' वाल्यांच्या बाजूला राहिलो,एस्टॅब्लिशमेंटचा प्रतिनिधी म्हणून काम केले.त्यामुळे मी युनियनच्या दृष्टीने सुरुवातीच्या काळात प्रतिगामी होतो.ती स्थिती तिथून पुढे तीस वर्षे तशीच राहिली.त्यानंतर कंपनीचा संचालक म्हणून झाल्यामुळे चक्क भांडवलदार झालो! पण सध्या,हे सगळे शब्द,मालक-मजूर संबंधांतून जवळ जवळ नाहीसे झाले आहेत.'युनिकेम'मध्येसुद्धा कंपनी सेक्रेटरी, फायनॅन्शीयल कंट्रोलर,पर्योनेल खात्याचा अलिखित प्रमुख म्हणून माणसांच्या

५६ सुरवंटाचे फुलपाखरू