पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय अकरावा



 ११.०१ पूर्वरंगात केलेल्या तात्त्विक चर्चेनंतर,मी माझ्या व्यवस्थापकीय जीवनात केलेले प्रयोग व उपयोग काही उदाहरणांनी यापुढच्या उत्तररंगाच्या अध्यायांत स्पष्ट करणार आहे.त्यासाठी माझी वैयक्तिक पार्श्वभूमी प्रथम लिहीत आहे.मी औषध बनवणाऱ्या एका कारखान्यात कंपनी सेक्रेटरी म्हणून १९६४ साली कामाला सुरुवात केली.त्यापूर्वी माध्यमिक शिक्षक, कारकून व प्राध्यापक अशा नोकऱ्या केल्या होत्या.त्यामुळे बऱ्यापैकी लोकसंपर्क होता.विशेष म्हणजे १९५३ ते १९६३ हा महाविद्यालयीन व पुढचा काळ मुंबई या महानगरात गेला.तो काळ पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांचा होता.स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या त्या कालखंडात सर्वत्र उत्साहाचे,देशाच्या औद्योगिक पायाभरणीचे वातावरण होते.हवेत समाजवाद,मुख्य म्हणजे केंद्र सरकारच्या हातात सर्व आर्थिक नियोजन,चे वातावरण होते.आर्थिक नियोजन दिल्लीहून होणार अशी हवा होती.त्या काळात कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वाचला.जॉर्ज ऑर्वेलच्या 'अॅनिमल फार्म' व '१९८४' या कादंबऱ्या महाविद्यालयीन अभ्यासात क्रमिक पुस्तके म्हणून वाचलेल्या होत्या.

 ११.०२ शाळेत असतानाच मुंज झालेली होती.संस्कृत शिकलो नव्हतो,त्यामुळे अजूनही मूळ संस्कृत गोष्टी इंग्रजीत लवकर समजतात.पण वडिलांनी थोडेफार पाठांतर करून घेतले होते.अधिक योग्य शब्द म्हणजे 'म्हटले होते.सुट्टीत वडील थोडेफार ते घटवायचा प्रयत्न करत.कारण आमचा पिढीजात

५४ सुरवंटाचे फुलपाखरू