पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भावनिक श्रद्धा जास्त बळकट होते.त्यातले जे टाकाऊ व हीण असेल ते जळून जाते आणि मूळ विचार प्रगल्भ होतो, झळाळून निघतो.अशा श्रद्धा सहजासहजी भंग पावू शकत नाहीत.
 ९.०५ भारतात आपण मूर्तीचे उत्सव करतो मूर्ती तर धातूची,काचेची,मातीची असते.ती घरी आणतात,तिची प्राणप्रतिष्ठा करतात,तिच्यात अक्षरशः प्राण फुकण्याचा प्रयत्न होतो.तिची पूजा करतात.काही दिवसांनी तितक्याच श्रद्धेने तिची उत्तरपूजा होते व तिचे विसर्जन केले जाते.अविनाशी आत्मा आणि मर्त्य शरीर हे वस्त्र ह्या मूळ कल्पनेवरच मूर्तिपूजेचा विचार व पद्धत आधारलेली आहे.
 ९.०६ आजच्या राजकारणातही पंतप्रधानांपासून सरपंच,राष्ट्राध्यक्षांपासून संस्थेचा अध्यक्ष ही सारी पदे असतात.व्यक्ती बदलत जातात.पदे कायम असतात.मूर्तिपूजेत,मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेत व यथावकाश विसर्जनात मूर्ती बदलणारी पण देवत्व कायमचे हाच विचार ठसवण्याचा प्रयत्न असतो.ह्या कल्पना नित्यनूतन,तावून-सुलाखून राखण्याचा प्रयत्न असतो.एकाच मूळ कल्पनेची अनेक विश्वरूपे.कालानसार बदलत प्रकट होत राहतात.प्रत्येक समाजाच्या अशा मर्मबंधाच्या ज्या गाठी असतात,त्या नित्य नव्या वेशात समोर येत असतात.रामायण-महाभारत हे तुमच्या आमच्या भोवती नित्य घडत असते.नवे रावण, नवे दुर्योधन, नवे कृष्ण नवनव्या रूपांत जन्माला येत असतात.परिवर्तनशीलता हा भारतीय विचारातला मूळ भाग आहे.व्यवस्थापनाच्या क्षेत्रात नव्या रूपात येणाऱ्या समस्यांची सोडवणूक करताना त्या त्या प्रश्नांच्या गाभ्याशी भिडण्यासाठी, तळ गाठण्यासाठी भारतीय विचारांच्या मुळाशी जाण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
 ९.०७ दुर्योधन पराक्रमी होता,शूर होता,शिकलेला होता.तो म्हणतो,
 जानामि धर्म नच मे प्रवृत्ति
 जानामि अधर्म नच मे निवृत्ती
 मला धर्म्य काय ते समजते, पण त्याकडे माझी नैसर्गिक ओढ नाही.अधर्म्य काय तेही मी जाणतो पण त्यापासून माझे मन ढळत नाही.अधर्माकडे धावणारी ही भावना,प्रवृत्ती किंवा हृदयवृत्ती त्याच्या शौर्याचा, धैर्याचा,बुद्धीचा,ज्ञानाचा उपयोग त्याला धर्माकडे करू देत नव्हती.त्याला समजत नव्हते असे नव्हे,कळत होते पण (मन) वळत नव्हते.

 ९.०८ भारतीय विचारात चार पुरुषार्थ सांगितले आहेत.धर्म,अर्थ,काम व मोक्ष.सन्मार्गाने जाणारी सामाजिक वागणूक कशी ठरवायची याचा खुलासा असा,

सुरवंटाचे फुलपाखरू ४७