पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ९.०३ पाश्चात्य विचारांतला बुद्धीवरचा भर,भावनात्मक नियंत्रणावर कमी भर दिल्यामुळे चिंतेची अवस्था निर्माण करतो.हे तिथल्या समाजधुरीणांनाही जाणवू लागले आहे.सतत वाढत राहणाऱ्या गरजा, त्या गरजा भागवण्यासाठी अधिकाधिक बुद्धीचा वापर,त्यामुळे होणारा नैसर्गिक साधनसंपत्तीचा हास यांमुळे पर्यावरण वगैरे संबंधीचे प्रश्न पुढे ठाकले.त्यांचे बुद्धिवादी उत्तर आता पाश्चात्य लोकांनाही बुद्धीला न पटणारे वाटू लागले आहे.सर्व धर्मपंथांची वासना-नियंत्रणाची,ययातीवाद न स्वीकारण्याची शिकवण आहे.ती पुन्हा महत्त्वाची वाटू लागली आहे.शेतीसारखा सर्वांच्या जीवनाशी जिव्हाळ्याचा संबंध राखणारा विषय निराळ्या दृष्टिकोनातून पाहिला जातो.बिनरासायनिक खते,बिनरासायनिक शेती-उत्पादन लोकप्रिय होऊ लागले आहे.नुसता बुद्धीने विचार करायचा झाला तर ज्यांना लुटता येईल त्यांनी जगातली निसर्गदत्त संपत्ती लुटावी व त्यांनी ती का लुटू नये हे प्रश्न आता व्यक्तिगत न राहता निरनिराळ्या प्रभुसत्तांमधले किंवा राष्ट्रराज्यांतले महत्त्वाच्या संघर्षाचे प्रश्न होऊ लागले आहेत.त्याला आवर घालणे नैतिक मूल्यांतून किंवा नैतिक मूल्यांवरच्या गाढ श्रद्धेतून होऊ शकेल.

 ९.०४ विनोबांनी पन्नास वर्षांपूर्वी हा विचार मांडला आहे.त्यांनी धर्म (पंथ वा रिलिजन या अर्थाने) व राजकारण (सत्ताकारण किंवा पॉलिटिक्स या अर्थाने) ह्या कालबाह्य झालेल्या गोष्टी आहेत.नवे युग हे विज्ञान (सायन्स) व अध्यात्म (स्पिरिच्युअॅलिटी) यांचे असणार आहे.देशाच्या सीमा तोकड्या ठरणार आहेत.म्हणून त्यांनी 'जय जगत'चा घोष केला.त्यांनी अध्यात्मातले जुन्यातले जुने विचार व ग्रंथ आणि विज्ञानातले अद्ययावत विचार व ग्रंथ यांची सांगड घालण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.विज्ञानाच्या सतत वाढत जाणाऱ्या शक्तीला आत्मज्ञानाची जोड़ नसेल तर विज्ञानाची संहारशक्ती अनावर होईल व त्यातून सर्वनाश अटळ आहे.भारतीय विचारपद्धतीत विचारसूत्रे महत्त्वाची मानली जातात.सूत्रे जुनीच पण त्याचा अर्थ नित्य नव्या विज्ञानाच्या प्रकाशात प्रत्येक व्यक्तीने शोधायचा असतो.त्या सूत्रांचा विस्तार करायचा असतो.मग त्याला जडत्व येऊ शकत नाही.कारण त्याला नव्या व्यक्तीबरोबर,नव्या विचारकाबरोबर नित्यनवे धुमारे फुटत राहतात. कुठल्याही राजकारणी प्रमेयात, तत्त्वज्ञानात, पुस्तकात, मतात, किंवा मठात विचार अडकावून ठेवता येत नाही, ठेवता कामा नये.विज्ञानात जशी प्रत्येक संकल्पना नवनव्या प्रयोगाच्या प्रकाशात पुनःपुन्हा तपासली जाते,त्यातले हीण टाकून देण्यात येते,तसाच समाजकारणात नित्यनूतनत्वाचा विचार महत्त्वाचा असतो.श्रद्धांचे विषय पुनःपुन्हा तपासल्यावर

४६ सुरवंटाचे फुलपाखरू