पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय नववा



 ९.०१ भारतीयांनी मन आणि बद्धी यांच्यात मनावर.मनाच्या व्यापारावर जास्त भर दिलेला आहे. कारण मन हा यंत्रातल्या मूळ जनित्रासारखा आहे.चेव ही मनाची अवस्था आहे.केवळ बुद्धीची क्षमता माणसाला कार्यप्रवृत्त करण्याला समर्थ नसते आणि काही कृती घडल्याशिवाय कोणताच बदल घडून येत नाही.मनाने दिलेली प्रेरणा योग्य दिशेने जाण्यासाठी, सन्मार्गावर राहण्यासाठी मनःशुद्धी ही आवश्यक गोष्ट मानली आहे.कारण कुठलीही शक्ती ही बरे किंवा वाईट,दोन्ही घडवू शकते.शक्ती ही यंत्रासारखी असते.त्याच्यामागच्या चालकाची प्रेरणा ही इष्ट-अनिष्ट परिणाम घडवते.

 ९.०२ योगी अरविंदांच्या मते.माणसाच्या मनाची वाढ प्रथम इतर प्राण्यांप्रमाणेच झाली.त्यामुळे पाशवी-भावनांचा मानवी मनावर जबरदस्त,अतिप्राचीन असा पगडा आहे.त्या मानाने बुद्धीची वाढ ही उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यावरची गोष्ट आहे.रंगपटलाचा इंद्रधनुष्यासारखा पट असतो,तशीच भावना व बुद्धी ही पटलाची दोन टोके आहेत.त्यांत भावनांच्या दृश्य भागापलीकडचा जो भाग असतो त्याचा इतिहास जुना आहे.त्यामुळे मनाची शुद्धता ही सर्व धर्मात महत्त्वाची मानली आहे.बुद्धाने म्हटले आहे,की विद्वान माणसाचे शहाणपण सुद्धा त्याच्या लालसेने भ्रष्ट होते.ही हाव त्याच्या सामाजिक व्यवहारांवर प्रतिकूल परिणाम करते.

सुरवंटाचे फुलपाखरू ४५