पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ८.०९ मूल्यांविषयी व्याख्याने देता येतात,शब्दचातुर्य वापरण्यास जमते,पण असे करू शकणाऱ्या माणसांना जवळच्या लोकांचा विश्वास संपादन करता येत नाही,कठीण वेळ आली तर ती टिकाव धरू शकत नाहीत.कठीण वेळ येते व जाते.फक्त कठीण निश्चयाची माणसे टिकून रहातात. कठीण निश्चय करायला श्रद्धेने, भावनेने स्वीकारलेली मूल्ये गाठीशी असावी लागतात.स्वदेशीचे,राष्ट्रप्रेमाचे मूल्य जिवापाड जपणारे जपानी लोक जपानी विमानाने प्रवास करतात,जपानी माल वापरतात आणि आंतर्राष्ट्रीय स्पर्धेत टिकून राहतात.तंत्रज्ञान बिनदिक्कत परदेशी आयात करतात पण आंधळ्या अनुकरणाने व्यवस्थापन पद्धती आयात करत नाहीत.स्वतःच्या राष्ट्रीय चारित्र्याशी सुसंगत अशी व्यवस्थापनपद्धत विकसित करतात. त्यांनी राष्ट्रीय सन्मान, देशभक्ती हे मूल्य मनापासून स्वीकारलेले आहे.त्याबद्दल त्यांच्या मनांत शंका नसते. अशा निःशंक मनाने,निश्चयाने काम होते तेव्हाच यश मिळते.
 ८.१० निसरड्या श्रद्धा,लाटालाटांनी वाहत येणारी व फक्त बुद्धीने स्वीकारलेली मूल्ये कठीण काळात आधार देऊ शकत नाहीत.मुळात डळमळीत असणाऱ्या गोष्टीचा आधार कुणाला काय उपयोगी पडणार? ती गटांगळ्या खाण्यास लावणारी परिस्थिती असते.

 ८.११ आपल्या श्रद्धांचा खुंटा मजबूत ठेवण्यासाठी स्वतःचा शोध,स्वतःच्या मनावर ताबा, स्वतःच्या वासनांवर ताबा,बाह्य उपाधींबद्दल उपेक्षा या साऱ्या गोष्टींचा सातत्याने अभ्यास व साधना या गोष्टी भारतीय विचारात सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत.सर्व भारतीय दर्शनांत अंतःशुद्धी व तिच्याद्वारे बाह्य शुचिता यांवर आचरणाचे नियम गुंफलेले आहेत.मनाची शांतता महत्त्वाची.समधात मन,शुद्ध मन ही कुठल्याही व्यक्तीच्या सुखातली पहिली पायरी असते.व्यवस्थापक,मालक,मजूर,नेते,अनुयायी या साऱ्यांचे पहिले ध्येय हे शुद्ध मनाची साधना हेच सांगितले गेले आहे.स्वतःच्या मनाच्या शुद्धतेवरचा भर हे खास भारतीय लक्षण आहे.कारण 'मी'चे अनेकवचन 'आम्ही' होते.ही मूळ गाठ पक्की आहे.

४४ सुरवंटाचे फुलपाखरू