पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गोधडीसारख्या वेगवेगळ्या रंगांच्या चिंध्या जोडल्यासारख्या होतात.त्यांचे आंतरिक सूत्रच हरवते.
 ८.०६ तडजोडीमागून तडजोडी,मग आपल्या मनाला पटवण्यासाठी त्या सोप्या करण्याचे प्रयत्न, चुकीच्या कृतीचे समर्थन करण्याचे प्रयत्न,त्यात आणखी फरफट असा गुंताडा वाढत जातो.
 ८.०७ त्यासाठी बाह्यदृष्टी टाळून अंतर्मुख होण्याचे महत्त्व असते. ती एक गरज बनते. कारण नाहीतर शहाणपण टिकवणे कठीण होऊन बसते.अंतर्यामी उडी घेण्याची, मन एकाग्र करण्याची आणि मी कोण आहे (कोऽहम्) हा शोध घेण्याची गरज वाढत जाते.त्या मार्गावरची वाटचाल साधनेशिवाय शक्य नसते.मानसिक शांती ही प्रत्येक माणसाची गरज असते.त्याशिवाय तो बाह्य आपर्तीना तोंड देऊ शकत नाही.त्याच्या जहाजावर बाहेरच्या घटनांच्या लाटा आदळत राहतात.त्याच्या शरीराची व मनाची सततची बाह्य झुंज ही चालू असते.त्याचवेळी अंतर्यामी जी एकसूत्रता,जीवनमूल्याविषयी पक्की समज व मूळ सूत्राशी पक्की जडवणूक असावी लागते ती नसेल तर मग त्याचा सुकाणूवरचा हात स्थिर राहत नाही. अशा दुहेरी ताणात वावरणारी माणसे मनातून दुभंगतात,सैरभैर होतात.व्यवस्थापनशास्त्रातला आधुनिक युगातला हा मोठा आव्हानाचा भाग आहे.

 ८.०८ जिथे मूल्ये ही केवळ सोयीची गोष्ट म्हणून त्यांची रेवडी उडवली गेली,मूल्ये ही साधुसंतांची, कीर्तनकारांची किंवा तत्त्वज्ञानातल्या लोकांची मिरास असे समजून त्यांकडे दुर्लक्ष करण्यात येते तिथे तिथे छिन्नमनस्क लोकांचा हा प्रश्न व्यापक होत आहे.मूल्ये परिस्थितीसापेक्ष असतात,खास करून आर्थिक परिस्थितीशी सापेक्ष असतात अशा कल्पना मांडल्या गेल्या.तिथे नवे ययाती जन्माला येत राहतात.सापेक्ष मूल्ये याचा अर्थ सोयिस्कर व निसरड्या श्रद्धा असा होतो.जिथे ही मूल्ये बुद्धीवर आधारलेली असतात,केवळ तार्किक चर्चेवर आधारलेली असतात,केवळ बुद्धीने स्वीकारलेली असतात, तिथे ती निसरडी ठरण्याची शक्यता जास्त असते.कारण सोय ही महत्त्वाची ठरते.पक्क्या निष्ठा, पक्का मूल्यविवेक ह्या धारणा श्रद्धेवर किंवा भावनात्मक बांधिलकीवर आधारलेल्या असू शकतात. कॉपी करून परीक्षेत यश मिळवणारा विद्यार्थी,पेपर फोडून पैसे कमावणारा अध्यापक,खोटे बोलून हाताखालच्या लोकांना आश्वासने देणारा व्यवस्थापक,अंतर्गत गुप्त माहिती वापरून स्वतःच्या कंपनीतल्या शेअर्सच्या खरेदीविक्रीत पैसे कमावणारा अधिकारी ही घसरड्या जीवनमूल्यांवर जीवन घालवणाऱ्या लोकांची उदाहरणे आहेत.

सुरवंटाचे फुलपाखरू ४३