पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घडवणार नाहीत तर तो मी पासून सुरुवात करून मी घडवणार आहे.हा विचार मोलाचा आहे.अधिकाऱ्याचा 'मी' हे सारे करणार आहे ते त्याच्यावर कुणाचे दडपण आहे म्हणून नव्हे,कुणी त्याला सांगते आहे म्हणून नव्हे,तर त्याच्या स्वतःच्या इच्छेने (फ्री विल) करणार आहे.ही भारतीय धारणा आहे.
 ७.१० मी स्व-तंत्र आहे.मी हे कारण आहे.घटिते ही माझ्यामुळे घडतात.मी कर्ता आहे आणि घटिते ही माझी कर्मे आहेत.प्रत्येक कर्माचे कर्मफल आहेच.ते मला चुकवता येणार नाही.ते मला सोडणार नाही.हा कार्यकारण संबंध,हा अनुल्लंघनीय निसर्गनियम आहे.ह्या कर्माचे फळ या किंवा पुढच्या जन्मी मिळेल,कारण मागच्या जन्मीच्या कर्माचे कर्मफल या जन्मात मी मिळवत असतो.ही जीवनाच्या सातत्याची कल्पना हा भारतीय विचारधारेचा भाग आहे.पर्यावरणाची चिंता साहजिकच आजच्या सामाजिक चिंतेचा सहज विषय बनते.वैदिक,वेदान्ती,सनातन,जैन या साऱ्या भारतीय धर्मपंथांनी वैयक्तिक कर्मवाद मान्य केलेला आहे.हे संचित प्रत्येक देहाबरोबरच्या सूक्ष्म कोषात आत्मा साठवत जातो.जेव्हा कर्मक्षय होतो,सारे संचित संपते तेव्हा मग मोक्ष किंवा निर्वाणाची प्राप्ती होते व आत्मा परमात्म्यात विलीन होतो अशी भारतीय सैद्धांतिक कल्पना आहे.
 ७.११ इतरांचे हक्करक्षण करणे हे व्यक्तीचे कर्तव्य ठरले की परस्पर संबंधातला विखार आपोआप संपतो.कर्तव्ये प्रत्येकाला आहेत.अधिकारी,सेवक,व्यवस्थापक,नोकर,मालक,मजूर,नागरिक,पिता,माता,पुत्र,कन्या,स्त्री,पुरुष या साऱ्या भूमिकांतील व्यक्तीची कर्तव्ये निहीत म्हणून सांगितलेली आहेत.त्यांची त्यांच्या कर्तव्याचरणामुळे घडणारी कर्मे त्यांना कर्मफले देणार आहेत.यात सर्वांच्या हितरक्षणाची सोय आपोआप आहे.
 ७.१२ भारतीय संस्कृतीने जी जीवनमूल्ये जोपासली आहेत,त्यामुळेच अर्जुनाला
 कृष्णा स्व-जन हे सारे
 युद्धी उत्सुक पाहुनी...
 कल्याण न दिसे युद्धी
 स्व-जनांस वधुनिया

 असा विषाद झाला होता.अटीतटीच्या युद्धात शत्रू हा सुद्धा स्व-जन आहे ही भावना मनांत पुरी रिघल्याशिवाय तसा तो होणार नाही.श्रीकृष्णाने अर्जुनाच्या विषादातले फोलपण निष्काम कर्माचा विचार सांगून संपवले व अर्जुनाला कृतयुद्ध केले.

सुरवंटाचे फुलपाखरू ३९