पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाया मानला जातो.यशस्वी व परिणामकारक व्यवस्थापनाचा विचार करताना हा फरक ध्यानात ठेवून व्यवस्थापनात पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत.
 ७.०७ माणसे काम का करतात ?लोकांकडून काम करवून घेण्याचे दायित्व ज्या व्यवस्थापकांवर आहे त्यांना या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते.त्यांना या मूळ प्रश्नाची खोल समज असायला हवी.या प्रश्नाचे सर्वसामान्य उत्तर,माणूस स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी,स्वार्थासाठी,पैशासाठी,अहंकार-तृप्तीसाठी, सत्तालालसेपोटी काम करतो असे आहे.देहभावावर आधारलेला स्व चा हा अर्थ व पाया मान्य केला की मग मी कमीत कमी काम करणार,जास्तीत जास्त नफा कमावणार,जास्तीत जास्त घेणार व कमीत कमी देणार हे तर्कप्राप्त आहे.माणसांमधले संबंध बळजोरी,सत्ता हिसकावून घेणे व त्याचे सामाजिक नियंत्रण यांवर आधारलेले असणार हे उघड आहे.समानता,सहभाव अशासारखी सामाजिक दृष्टीने महत्त्वाची मूल्ये आहेत,त्यांच्याकडे केवळ साधन म्हणून,सोय म्हणून पाहिले जाणार व वापर केला जाणार हे तर्कतः बरोबर ठरणार.
 ७.०८ भारतीय विचाराचा सारा भर या छोटा स्व ला किंवा स्वार्थाला स्वतःच नियंत्रणात ठेवून, त्याचे मोठ्या विशाल स्व मध्ये परिवर्तन करणे यावर आहे.मोठ्या स्व च्या व्याख्येत इतरांचा समावेश आपोआप होणार आणि मग 'स्वतंत्रः कर्ता' या व्याख्येप्रमाणे भोवतालच्या साऱ्यांचे हितरक्षण हा व्यक्तीच्या कर्तव्याचा भाग बनतो.दुसऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणे हे कर्तव्य ठरते.कारण हे दुसरे कोणी परके नसून व्यक्तीचे सहावयवी वा सहचर वा सहोदर आहेत.कुठल्यातरी परम शक्तीसमोर मी समान असेन,ईश्वरासमोर मी समान असेन,तरी माझे वेगळेपण हे शिल्लक राहते.पण एकाच परमात्म्याचा मी अंश आहे आणि इतर सारे हेही तसेच त्या परमात्म्याचे अंश आहेत,त्यांचा-माझा अ-द्वैत संबंध आहे हे मान्य केले तर काम सोपे होते.हातांनी पायांचे, पायांनी पोटाचे,डोक्याने मानेचे रक्षण केले,असे आपण म्हणत नाही कारण सर्व सहअवयवांचे ते कर्तव्य आहे.विशाल अर्थाने ते त्यांचे प्रत्येकाचे स्व चे काम असते.द्वैतीभावनेने नव्हे,सोय म्हणून नव्हे,फायद्याचे म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून दुसऱ्यांचे हितरक्षण करणे हे व्यक्तीला क्रमप्राप्त ठरते.
 ७.०९ वरिष्ठ अधिकाऱ्याने हाताखालच्या लोकांचे, समान पातळीवरच्या अधिकाऱ्यांचे हितरक्षण करणे, स्वतःच्या कर्तव्याचा भाग म्हणून स्वयंप्रेरणेने करणे हा एक वेगळा क्रांतिकारी दृष्टिकोन आहे. क्रांतिकारी बदल आहे.हा बदल कायदे करून, अधिकारी नेमून घडणार नाही.हा बदल वरिष्ठ अधिकारी