पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ६.९ पाश्चात्य विचारात व्यक्ती समूहापेक्षा वेगळी मानली जाते.भारतीय विचाराची सुरुवात मुळी व्यक्ती ही समाजाच्या देहाचा अवयव आहे येथून होते.मी ची व्याप्ती कशी वाढत जाईल व त्याच्या व्याख्येत अधिकाधिक माणसे कशी बसतील, हे समाज-देहाच्या हिताच्या दृष्टीने गरजेचे असते. विचारांचा प्रवाह समूहाकडून व्यक्तीकडे न जाता व्यक्तीकडून समाजाकडे कसा जाईल हे पाहिले जाते.बाहेरून आत असा विचार न करता आतून बाहेर फाकणाऱ्या तेजासारखा व्यक्तीचा विचार केलेला आहे. विनोबांच्या शब्दांत सांगायचे तर 'मी'चे अनेकवचन ‘आम्ही' होते.म्हणजे मी केले नाही तर आम्हीही काही करणार नाही.आम्ही अमुक करायला हवे, लोकांनी अमुक करायला हवे,समाजाने अमुक करायला हवे, दुसऱ्यांनी अमुक करायला हवे, दुसरे चांगले वागले तर मी चांगला वागेन हे सर्व विचार परावलंबी आहेत.चांगले वागायला मला वाट पाहण्याची गरज नाही.मी सुरुवात माझ्यापासून करायला हवी.या बाबतीतील परावलंबन माझे कर्तृत्व व वाढ रोखणारे आहे.हा विचार माझा 'कर्ते'पणा हिरावणारा आहे. मी जगाला फार थोडे सुधारू शकेन पण मी स्वतःला खूप बदलू शकतो.मी सुरवंटाचा फुलपाखरू बनू शकतो.मी या समाजाचा अवयव आहे.अवयवाच्या पेशीच अवयव बदलत असतात.हानी भरून काढत असतात.मीच माझ्या पेशींची झीज भरून काढायला हवी.मीच बदलायला हवे.माझ्यासारखे अनेक 'मी' यांना जोडणारा समाज आहे.त्यांना जोडणारे एक समान सूत्र आहे.माझ्यासारखे अनेक कर्ते मिळून समाज बनलेला आहे, हा भारतीय विचार व्यष्टीकडून समष्टीकडे जाणारा आहे.मला कोणी मोक्ष देणार नाही.तो माझा मी मिळवायला हवा.
 ६.१० समाजात जे बदल व्हायला हवेत असे मला वाटते त्याची सुरुवात मी माझ्यापासून करायला हवी.मी स्वतःला सुधारू शकतो.मी स्वतःला नम्र बनवू शकतो.मी अहंकार टाकू शकतो.ही भूमिका घेतली, हा विचार समजावून घेऊन तशी कृती सुरू केली की मोठमोठे जटिल सामूहिक प्रश्न सोपे होतात.मुख्य म्हणजे फार मोठा किंवा जटिल प्रश्न आहे म्हणून व्यक्तीने काहीच न करता बसून राहायचे, हा प्रकार घडत नाही.काहीतरी कृती घडत राहते.

 ६.११ वेदांत एक गोष्ट आहे.एकदा दहाजण एका दाट जंगलातून शिकारीला चालले होते. जंगल निबिड होते.हिंस्त्र श्वापदांची भीती होती.सर्वांनी एकमेकांच्या नजरेच्या टप्प्यात किंवा किमान एकमेकांच्या हाकेच्या अंतरात राहणे आवश्यक होते.मधुनमधून सर्वजण एकत्र आहोत ना,कुणी चुकला-हरवला नाही ना याचा शोध घेणे गरजेचे होते.एकदा असा तपास

३४ सुरवंटाचे फुलपाखरू