पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घडते. थोड्या वेळापुरते का होईना, मौन, ध्यान, स्वतःच्या श्वासोच्छ्वासावर नियंत्रण करण्याचा रोज प्रयत्न केला की मनाचे नियंत्रण होते.देह म्हणजेच केवळ मी आणि या मी चा अहंकार कमी होऊ लागतो.मन देहाबाहेरचा विचार करायला अनुकूल बनते.प्रार्थना, सामूहिक प्रार्थना, अशासारख्या कर्मकांडाचा हेतू रोज कामाला जीवनव्यवहाराला सुरुवात करण्यापूर्वी हे ध्रुवीकरण, हे एकत्रीकरण साधण्याचा असतो. वेदांत म्हटले आहे,
 समानीऽव आकूति
 समाना हृदयानिव
 समानमस्तु वो मनो
 समानः सुसहासति ।
 आमचे ध्येय एक असू दे.आमचे हृदय एक असू दे.आमची मने एक असू देत.अशाच समानतेने आम्ही दिवस घालवू.हे साधले की 'सहवीर्य करवावहै'ची तयारी पूर्ण होते.कुठल्याही सामूहिक कामाला मनांच्या समानीकरणाची गरज असते.
 ६.०७ एकदा का मनांचे समानीकरण झाले की मग व्यक्ती-व्यक्तीच्या रंगभूमीवरच्या भूमिका वेगवेगळ्या असतील, पण सर्वांचे नाटक एक आहे हे समजणे सोपे जाते.भूमिका लहानमोठ्या असतात, त्यात उतरंड असते लहानमोठेपणा असतो.रंगभूमीवरच्या त्या भूमिकेपेक्षा मी वेगळा आहे हे समजले की व्यक्ती समान होतात.कामे कमीजास्त उंचीची असतात पण माणूस म्हणून सारे समान असतात.मोठी कामे घडवायची असतील,अशक्य गोष्टी शक्य करायच्या असतील, तर तसे आचरण आवश्यक ठरते.

 ६.८ काम करणारे वेगवेगळ्या वाद्यवादकांसारखे असतात.त्या त्या वाद्याची, वादकांची पद्धत वेगवेगळी असते.साऱ्यांचा सूर मात्र एक असतो.राग एक असतो.साऱ्यांचा राग एक, सूर एक असला तर त्यातून एकतानता अनुभवता येते.बेसुरेपणा-गोंगाट होत नाही.त्याऐवजी निरनिराळी वाद्ये, निरनिराळे राग उत्तमपणे एकाच वेळी वाजवले गेले तर कर्कश गोंगाटापलीकडे काही हाती लागणार नाही,काही अनुभवता येणार नाही.म्हणूनच भारतीय दर्शनशास्त्रात मनांच्या समानीकरणावर खूप भर दिला जातो. साऱ्यांनी एकच वाद्य वाजवावे असा आग्रह नसतो,पण राग एक असावा,दिशा एक असावी.साऱ्यांची प्रगती छोटा मी पासून मोठा मी पर्यंत पसरत जाणारी असावी.हे परम साम्य, परम समानतेचे तत्त्व विनोबांनी गीतेचे सार म्हणून सांगितले आहे. 'अभिधेयं परं साम्यम्' हा सर्व भारतीय विचाराचा मूलाधार आहे.

सुरवंटाचे फुलपाखरू ३३