पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाकरीचा आकार वाढत नाही.मालक-मजूर संबंधांची मारामारी कमीकमी होत जाणाऱ्या भाकरीच्या तुकड्यावर केंद्रित होते.म्हणूनच मात्सुशिटा कंपनीने 'उद्योगातून राष्ट्रसेवा' ही पहिली जबाबदारी मानली आहे.हे बृहत् ध्येय (सुपरऑर्डिनेट गोल) ठरवले आहे.कंपनी रोजच्या प्रार्थनेतून ते बिंबवण्याचा प्रयत्न करते.उद्योगातली ही मूळ संकल्पना जेवढी विशाल तेवढी उद्योगाची अनेक लोकांना सामावून घेण्याची शक्ती मोठी असते.संकल्पनेची चौकट लहान असेल तर उद्योग किती जणांना वेढून त्यांत सामावून घेणार? किती जणांना सहभागी करणार? किती शक्ती जोडणार?
 ६.०३ धंद्याच्या अध्वदूंच्या मोठ्या चौकटीत (कॉण्टेक्स्टमध्ये) अनेक लोकांना त्यांचे संदर्भ लाभतात, त्यांच्या लहान चौकटी बसवता येतात.आस्थापनेचा 'कॉण्टेक्स्ट' त्यात काम करणाऱ्यांच्या 'टेक्स्ट'ना आधार पुरवतो.व्यवस्थापकीय परिणामकारकता ठरवताना हे महत्त्वाचे घटक असतात.
 ६.०४ मोठे ध्येय समोर असले की दुसरा एक फायदा असा होतो, की माणसाला स्वतःच्या वैयक्तिक शरीराची आणि त्याच्या छोटेपणाची सतत जाणीव राहते.आपण दुसऱ्या लोकांवर अवलंबून आहोत हे लक्षात येते आणि नम्रता अंगी बाणायला सहज मदत होते.भारतीय दर्शनशास्त्रात नम्रता मोलाची मानलेली आहे.नम्रता खरोखरी स्वतःच्या वागणुकीत मुरवायची असेल तर स्व चे छोटेपण सदैव मनात राहायला हवे.
 ६.०५ माणसाच्या मनाला शिकवणीची नित्य गरज असते.त्याचे मन चंचल असते.कुठल्याही गोष्टीवर मन केंद्रित करायला साधना करावी लागते.माणसाच्या मनाचे वर्णन कवीने असे केले आहे,
 आधीच मर्कट तशातही मद्य प्याला,
 झाली तयास वृश्चिकदंशबाधा
 चेष्टा वदू मग किती कपिच्या अगाधा ।
 मन हे माकडासारखे चंचल असते.त्यातच, ते माकड तृप्त न होणाऱ्या वासनांचे मद्य पिते.त्यातच, त्याला मत्सर व असूया या खेकड्याचा दंश झाल्यावर त्याच्यातला अहंकार हा दैत्य आहे तो फणा काढून उसळतो, अशा त्या माकडाच्या मर्कटलीला काय वर्णन कराव्यात!

 ६.०६ चंचल मनावर काबू मिळवायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे त्याला दिशा दाखवणे किंवा त्याचे ध्रुवीकरण ठीक करणे ही होय.लोहचुंबकाचा तुकडा जर साध्या लोखंडावर फिरवला तर त्याचे दक्षिण। उत्तर ध्रुव समान होऊन लोखंडात चुंबकत्वाची शक्ती संक्रमित होते.हे अर्थात थोड्या वेळासाठी

३२ सुरवंटाचे फुलपाखरू