पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छोट्या परिघात स्वतःला कोंडून घेतात. कुणीही त्यांच्यासाठी काम का करावे याची तोकडी उत्तरे ते देऊ शकतात.
 ५.१० 'अणोऽरअणीयान् महतोमहीऽयान्' यातल्या पहिल्या छोटा परिघात अडकून राहतात. अशी माणसे कुठल्याही संस्थेत उच्च अधिकारपदावर असली तर ती इतरांनाही त्यांच्याच संकुचित पातळीवर खेचण्याचा प्रयत्न करतात हे आपण पाहतोच. त्यांचा आवाकाच लहान असतो. मोठी स्वप्ने पाहण्याचे त्यांना जमत नाही. ते स्वतःची वाढ करत नाहीत व हाताखालच्या लोकांनाही वाढू देत नाहीत. कारण त्यांच्या कोत्या जगात दुसऱ्यांच्या हिताची कल्पनाच बसत नाही. पहिल्या कर्त्याने जोमदार वाढवलेली कंपनी वारसांच्या मोडक्या हातून नष्ट होते हे सर्वत्र दिसतेच.
 ५.११ व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाचे 'माणसे काम का करतात' ह्यासंबंधी काही गणित असते. स्पष्टपणे विचार करून ठरवलेले असो वा नसो, स्पष्टपणे पटलेले असो वा नसो, पण प्रत्येक व्यवस्थापकाच्या मनात माणसे काम का करतात याबद्दल काही गृहीत कृत्य असते. प्रत्येक पुढाऱ्याच्याही मनात ते तसे असते. खरे तर, हाच खूप महत्त्वाचा आणि मूलभूत प्रश्न आहे. व्यवस्थापन, व्यवस्थापनाचा दर्जा, व्यवस्थापनाची परिणामकारकता, यशस्वीता या मूळ धारणेवर आधारलेल्या असतात. जो त्याच्या 'स्व' ची व्याख्या त्याच्या शरीराबाहेर नेऊ शकत नाही, कल्पू शकत नाही असा नेता, असा पुढारी, असा मालक, असा व्यवस्थापक, असा सुपरवायजर त्याच्या हाताखालच्या लोकांची कामामागची प्रेरणा आपल्या संकुचित पातळीवर रोखून ठेवत असतो. त्याचा परीघ छोटा, त्याची चौकट संकुचित असल्यामुळे त्याच्या हाताखालच्यांची घुसमट अपरिहार्य होऊन बसते. तुमचे स्वप्न छोटे, संकुचित आणि तुमच्या शरीराच्या वैयक्तिक सुखाएवढे मर्यादित असेल तर तुमच्या हाताखालच्या लोकांना अवकाश कुठे राहणार? त्यांना त्यात रस का असावा? अशा ठिकाणी त्यांनी हात राखून काम करणे स्वाभाविकच नाही का?

 ५.१२ हाताखालच्या लोकांची क्षमता फुलवून त्यांची फुलपाखरे होऊ देणार की त्यांना सुरवंटच राहू देण्याचा आटोकाटात प्रयत्न करणार हा व्यवस्थापकाने स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. त्याची उत्तरे त्यानेच शोधायची असतात. कुठलाही धंदा वा व्यवसाय ही नित्य वाढणारी किंवा खंगणारी जिवंत गोष्ट असते. कायद्याने निर्माण केलेल्या सरकारी उद्योगधंद्यांच्या कंपन्या निर्जीव व स्पर्धेला घाबरणाऱ्या का होतात यांचे उत्तर यात आहे. वर्धिष्णुता किंवा मरण या माणसाच्या शरीरासारख्या अपरिहार्य गोष्टी औद्योगिक, व्यावसायिक संघटनांना

सुरवंटाचे फुलपाखरू २९