पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आत्मा आणि परमात्मा यांची जोड किंवा एकत्व आपण ह्या मानसिक शक्तीमुळे पाहू शकतो.
 ५.०७ माणसाने स्वतःला असे ताणले, वाढवले, विस्तारले की मग तो अनेकांना त्याच्या विश्वात सहज सामावून घेऊ शकतो. त्याच्या शरीराचे सुख, दुःख, आनंद, खेद, फायदा, तोटा ह्या जगातल्या इतर माणसांच्या दृष्टीने फार कमी महत्त्वाच्या वा सीमित महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यात दुसऱ्या कोणाचा सहभाग होऊ शकत नाही. 'स्वार्थबुद्धिः परार्थेषुः' हे वाग्भटाचार्यांचे वचन प्रसिद्ध आहे. सारे जग माझ्या फायद्यासाठी आहे या प्रेरणेने जर माणूस जगू लागला, काम करू लागला तर त्याचे त्याच्या सिद्धीही या मर्यादित राहतील. तो 'मी म्हणजेच माझे शरीर' या परिघात घुसमटत राहील. सर्वात महत्त्वाची मर्यादा म्हणजे त्याचा कार्यकाल ही फार छोटी गोष्ट असल्याने तो दूरचा विचार करू शकणार नाही. पण जर का माणूस त्याच्या स्व च्या कल्पनेचा विस्तार करू शकला तर मग त्याचे कुटुंब, त्याचा समूह, त्याची जात, त्याचे मोहल्ला- प्रांत-देश-जग अशा गोष्टी तो त्यांत कलेकलेने समाविष्ट करू शकेल. सर्वांना हे साधेल असे नव्हे, पण सर्वांच्या विचाराची दिशा ती असायला हवी. प्रत्यक्ष अनुभव किंवा प्रत्यय कितीही मर्यादित राहो, पण त्यामागची भावना, प्रेरणा, चेतना अशी नित्य नवी स्वप्ने पाहणारी, कलाकलाने वाढणारी, पसरणारी हवी.
 ५.०८ भारतीय विचारपद्धतीप्रमाणे स्व कडून परमात्म्याकडे जाण्याची जी गोष्ट आहे तो जर आधार धरला तर माणसाचा दृष्टिकोन बदलेल, चौकट बदलेल. भौतिक गोष्टी तशाच राहूनही, भोवतालची माणसे तशीच राहूनही, त्याच्या मनाचे संदर्भ बदलतील. ही मोठी स्वप्ने पाहण्याची, विस्तार पाहण्याची आणि त्याचे आपल्याशी असलेले नाते पाहण्याची मानसिक भावना भारतीय दर्शनात महत्त्वाची मानलेली आहे. ती एखाद्या मूर्तीपर्यंत, एखाद्या प्रदेशापर्यंत, एखाद्या देवापर्यंत पोचली तरी खूप मानसिक प्रवास होतो. खूप वाढ होते, त्याच्याही पलीकडे आपली झेप जाऊ शकते.

 ५.०९ भारतीय दर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे ती देवाच्या किंवा इश्वरापलीकडेही पोचू शकतात. अनंत ही संकल्पनाच अशी प्रसरणशील आहे. देव या कल्पनेपेक्षा वाढू शकणारी, अद्वैताची कल्पना विस्तारू शकणारी. याची दोन कारणे आहेत. दर्शनांत कल्पना करण्याचे किंवा विचार करण्याचे हे स्वातंत्र्य (फ्री विल) प्रत्येक व्यक्तीला आहे. बरेचसे देव न मानणारे लोक स्व चा विस्तार त्यांच्या स्वतःच्या देहापर्यंत किंवा त्यांच्या शरीराबाहेर करू शकत नाहीत किंवा करत नाहीत. स्वतःचे शरीर किंवा देह हेच अंतिम सत्य मानून फार

२८ सुरवंटाचे फुलपाखरू