पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ५.०३ सर्व प्राणी क्षणाक्षणाने आणि त्या त्या क्षणापुरते जगत असतात त्यांना कालाआजाउद्या असा काळाचा संदर्भ समजतो का हे माहीत नाही. पण माणसाला तो समजतो. त्यामुळे भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ या संकल्पना त्याला समजतात. माणूस स्वतःला भूतकाळाशी जोडतो, वर्तमानात जगतो आणि भविष्याची स्वप्ने पाहतो. मागचे-पुढचे पाहण्याची शक्ती ही माणसात असते. माणसाच्या मागे ज्या चिंता, काळज्या, मानसिक दबाव व ताण निर्माण होतात त्यांच्यामागे ही मानसिक शक्ती असते. म्हणून शरीर न बदलता, प्रत्यक्ष शरीरात बदल न घडवता माणूस उद्यांचा विचार करू शकतो. स्वतःला चिरंतनाशी जोडून स्वतःला पसरवू शकतो, स्वतःचा विस्तार करू शकतो. स्वतःमध्ये मानसिक बदल किंवा क्रांती घडवू शकतो. फक्त स्वतःच्या शरीरापुरते पाहत, आताच्या क्षणापुरता विचार केल्यास, फक्त पायाखालचे पाहत राहणारा माणूस क्षुद्र बनतो. तो वाढू शकणार नाही. तो खुजा किंवा थिटा राहील. ही भूत-भविष्य पाहण्याची शक्ती त्याच्या काळज्या वाढवते. त्याचप्रमाणे त्याची वाढ, विस्तार यांची स्वप्ने त्याला देऊ शकते.
 ५.०४ मनाच्या या शक्तीमुळे आपण पाठच्या गोष्टी आठवू शकतो. कल्पनेने ते ते सारे परत परत आठवू शकतो, उद्याच्या कल्पना करू शकतो. विजेच्या वेगापेक्षा जास्त वेगाने एका जागेहून दुसऱ्या जागी मनाला नेऊ शकतो. मनःचक्षुसमोर नवीन प्रदेश काळ, घटना, व्यक्ती, दृश्य, आणू शकतो. आणि हे सारे शरीर एका जागी स्थिर राहून आपण साधू शकतो.
 ५.०५ या विवेचनावरून दोन गोष्टी स्पष्ट होतील. सुरवंटाचे फुलपाखरू होण्याची क्षमता मनामुळे आपल्या प्रत्येकाच्या अंगात मुळात दडलेली आहे. ती झाकून ठेवायची, दडपायची की तिला वाढू द्यायचे हे प्रत्येकाच्या स्वतःच्या हातात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माणसाचे शारीरिक व्यक्तित्व ही खूप छोटी, मर्यादित वस्तू आहे. माणसाचे मानसिक व्यक्तित्व हे खूप मोठे होऊ शकणारे व्यक्तित्व आहे.

 ५.०६ भारतीय विचारधारेप्रमाणे माणसाने अंतरात्म्याचा शोध घेण्याचा जो मार्ग सांगितला आहे तो अंतर्मनाचा शोध घेता घेता खूप मोठे मानसिक व्यक्तित्व घडवण्याचा मार्ग आहे. हा शोध जर जास्तीत जास्त केला तर स्वतःच्या छोट्याशा शरीराच्या आत असलेल्या 'मी'ला सबंध जग सामावून घेऊन त्याच्याही पलीकडे पाहण्याची शक्ती त्याच्यात येऊ शकते. 'स्थिरचर व्यापून अवघा, तो परमात्मा दशांगुळे उरला' असा अनुभव त्याला येऊ शकतो. अनंताची ही संकल्पना त्याला शरीराच्या कोशाबाहेर पडण्यास मदत करते.

सुरवंटाचे फुलपाखरू २७