पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय पाचवा




 ५.०१ स्व ची मानसिक कल्पना शरीर किंवा देहापुरती मर्यादित ठेवली तर मग स्व चा विकास किती होणार याला मर्यादा पडतात. तुमचे वय, तुमचे आरोग्य यांच्या त्या मर्यादा पाडतात. शरीराला होणारे सुखदुःख, हर्षखेद या साऱ्यांनी ही मर्यादा आणखी कोती होत जाते. सुरवंटाचे फुलपाखरू होण्याची शक्यताच संपुष्टात येते. सुरवंटाचा लठ्ठ सुरवंट, मोठा सुरवंट ही कल्पनेची भरारी होऊ शकते. पण स्व ची कल्पना शरीरापलीकडे आत्म्यापर्यंत पोचवली तर परमात्म्याचे अनंतत्व मनासमोर खूप मोठा अवकाश उभा करू शकते. तसे घडले तरच मनाची चौकट मोठी होऊ शकते, क्षितिजे रुंदावतात व सुरवंटाचे फुलपाखरू होण्याइतका आमूलाग्र बदल (ट्रान्स्फॉर्मेशन) होऊ शकते.

 ५.०२ सुरवंट तरी काय करतो? तो स्वतःला स्वतःच्या शरीरातून निर्माण केलेल्या तंतूंच्या कोषात गुंतवून घेतो. त्या कोषाच्या अंतरंगात जाऊन स्वतःची जी बाह्य अंगे असतात, ते कवच टाकून स्वतःची नवीन रचना करून जमिनीवर किंवा फांदीवर सरपटण्याचे छोटे जीवन टाकून, पंख लाभलेले, खूप मोठे जग पाहू शकणारे, उडू शकण्याची क्षमता असलेले असे रूप धारण करतो. सुरवंटाच्या बाबतीत हे सारे बदल त्याच्या शरीरात घडतात, पण सुरवंटातला जीव आणि फुलपाखरातला जीव हा एकच असतो. हे आपण प्रत्यक्ष पाहू शकतो. माणसाचे मन हे त्याच्या शरीरापेक्षा शक्तिमान आहे. शरीर तेच राखून मन आणि बुद्धी ह्यांच्या जोरावर माणूस त्रि-भुवनाची कल्पना करू शकतो,

२६ सुरवंटाचे फुलपाखरू