पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परीघात माणूस वावरत राहिला तर मग सर्व सृष्टीशी जोडलेले प्रश्न, समाजाचे प्रश्न, जगाचे प्रश्न, पर्यावरणाचे प्रश्न हे सारे परके ठरतात. मला काय त्याचे? शरीराला, इंद्रियांना समजेल-आवडेल-प्रिय होईल, तेवढेच माणूस करणार ही त्या भूमिकेची सरळ तार्किक परिणती होते. किंवा व्यक्तीच्या आयुष्यात जर एखाद्या गोष्टीचा दुष्परिणाम तिला भोगावा लागणार नसेल तर तिने पर्यावरणाचा विचार कशासाठी करायचा हा प्रश्न स्पष्ट होऊ शकतो.
 ४.१६ पाश्चात्य व्यवस्थापन तंत्रात, शरीरशास्त्रात, समाजशास्त्रात, अर्थशास्त्रात, सर्वत्र माणूस म्हणजे त्याचे शरीर, व्यक्ती म्हणजे केवळ देह एवढा मूळ पाया आहे असे गृहीत धरलेले आहे. त्यांच्या धर्मश्रद्धेप्रमाणे त्यात व्यक्तीला आत्म-स्वातंत्र्य नाही. ती व्यक्ती ईश्वरी कृपेने सुखी होऊ शकते,स्वर्गाला जाऊ शकते. ईश्वरी आज्ञांचे पालन केले म्हणजे व्यक्तीच्या सुखाचा मार्ग मोकळा होतो. व्यक्ती कर्ता नव्हे. ही तिथल्या धर्मसंस्थेची भूमिका होती. याउलट कर्त्यांची भारतीय व्याख्या मुळी 'स्वतंत्रः कर्ता।' अशी आहे. ते स्वातंत्र्य शरीराला नाही. म्हणून निर्णयाचा दिवस, डे ऑफ जजमेंट, कयामत का दिन येईपर्यंत व्यक्ती म्हणजे तिचे शरीर पेटीत सन्मानाने पुरून ठेवले जाते.
 ४.१७ याउलट, भारतीय विचाराप्रमाणे आत्म्याला स्वातंत्र्य आहे. व्यक्ती ही शरीरापलीकडे आहे. 'वासांसि जीर्णानि यथा विहाय', म्हणजे मृत्यू होतो तेव्हा आत्मा देहाचे वस्त्र टाकून दुसरे वस्त्र धारण करायला मोकळा होतो. तेव्हा हे जुने वस्त्र नष्ट करणे, जाळून टाकणे हा भाव भारतीय विचारपरंपरेत आढळतो. देहभावाविषयीच्या विचारांतला हा फरक महत्त्वाचा आहे. ह्याचे मोठे परिणाम होतात. वर्तुळाचा मध्यबिंदू सूक्ष्म असतो. त्या सूक्ष्मातले छोटे छोटे वाटणारे फरक, जेव्हा वर्तुळाचा परीघ वाढत जातो तेव्हा खूप मोठे व न जोडता येण्याजोगे, न समजण्याइतके किंवा विरोधी वाटण्याएवढे मोठे होत विस्तारत जातात. मुळांतला हा छोटा फरकही दूरगामी परिणाम करणारा ठरतो.

 ४.१८ जे कुठलीही धर्मश्रद्धा मानत नाहीत त्यांचा प्रश्नच वेगळा. आपल्याकडचे बरेच सुशिक्षित लोक व व्यवस्थापक पुष्कळ वेळा पूजापाठ, प्रार्थना किंवा मंदिरांना भेट या अर्थाने धार्मिक आचरण करतात वा धर्मपालन करतात, पण कामाच्या ठिकाणी या सर्व विचारांच्या अभावाचा 'इहवाद' या नावाने आधार घेतला जातो. मी काम करताना अंगचोरपणा केला, काम केलेच नाही, पगार घेतला पण त्याची श्रमातली किंमत दिली नाही तर मी अधर्म केला असे मानले जात नाही. मी केलेला करार पाळणे हे माझे कर्तव्य आहे हे मुळात मानले जात नाही. कामगार-व्यवस्थापकांची कर्तव्यच्युती ही

२४ सुरवंटाचे फुलपाखरू