पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ४.१२ मी कसा बदलणार, कसा फुलणार, कसा बहरणार, कसा फळणार, माझी उन्नती कशी होणार याचा विचार स्व पासून सुरू करायचा. सामान्यतः मी म्हणजे माझा देह किंवा माझे शरीर असा विचार होतो. कारण उघड आहे. प्रत्यक्ष दिसते ते शरीर. जी ज्ञानेंद्रिये आहेत ती शरीराची आहेत. दोन कान, दोन नाकपुड्या, दोन डोळे, एक तोंड व मलमूत्रविसर्जनाची दोन द्वारे अशी नऊ दारे शरीराला आहेत.म्हणून शरीराचे धर्मशास्त्रातले नाव 'नवद्वारपुरी' असे आहे. नवद्वारपुरीत अंतर्यामी वसणारा अंतरात्मा हा खरा महत्त्वाचा. 'मी' कोण चे उत्तर 'हा अंतरात्मा' असे आहे. देह हे त्याचे वस्त्र आहे. वाहन आहे. त्याचा शोध हा स्वतः घ्यायचा असतो आणि तो भारतीय अध्यात्मात महत्त्वाचा विषय मानलेला आहे.
 ४.१३ माणसाला ज्ञान होते ते पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून, म्हणून स्व मध्ये बदल घडवायचा असेल तर त्याचा पहिला आणि सर्वात कठीण टप्पा म्हणजे, शरीर म्हणजे स्व किंवा मी नव्हे हे समजणे होय. हा देह आणि त्यातील अंतरात्मा म्हणजे 'देही' ही स्व च्या ज्ञानाची पहिली पायरी मानली जाते. ती पार केली तरच अनुभूतीचा पुढचा प्रवास शक्य होतो.
 ४.१४ आद्य शंकराचार्यांना त्यांच्या भारत परिक्रमेत नर्मदेच्या तीरावर गोविंदपादांनी, बाळा तूं कोण आहेस, 'कस्त्वम्?' हा प्रश्न विचारला. त्याला त्यांनी उत्तर दिले ते सहा कडव्यांचे उत्तर आत्मषटकम् किंवा निर्वाणषटकम्, या नावाने प्रसिद्ध आहे. आचार्य त्यात मी कोण नाही हे सविस्तर सांगतात आणि शेवटच्या एका ओळीत 'चिदानंदरूपः शिवोहं शिवोहम्' असा उद्घोष करतात. अतिशय प्रेरणादायी, स्वच्छ, रोखठोक असे खास आचार्यांच्या शैलीतील हे उत्तर आहे. वानगीदाखल त्यातले पहिले कडवे पाहू या.
 मनोबुद्धिहंकारचित्ताणिनाहम्
 नच श्रोत्र जिह्वे नच घ्राण नेत्रे
 नव्योमभूमि तेजोनवायुः
 चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् । चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ।
 अशा या मधुर गीताच्या तालावर स्व चा शोध सुरू झाला की मोठा पट उलगडू लागतो. हा मानसिक पट म्हणजे शरीरापेक्षा वेगळा, शरीरापेक्षा मोठा, शरीराला वेढून त्यापेक्षा मोठा व सतत पसरत जाणारा स्व चा हा विस्तार व त्याचे अवकाशाशी नाते मनाच्या डोळ्यांसमोर आले की मग भारतीय विचारधारेचा वेगळेपणा स्पष्ट होऊ लागतो.

 ४.१५ शरीर म्हणजे व्यक्ती, शरीर म्हणजेच मी, एवढ्या छोटा मानसिक

सुरवंटाचे फुलपाखरू २३