पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाहीत. जेव्हा लोक कुठल्यातरी मोठ्या ध्येयाने प्रेरित झालेले असतात तेव्हाच सतत वाढत राहणारी उत्पादकता व उत्तमता हे भारून टाकणारे ध्येय होऊ शकते. 'सोल्जर फाइट्स फॉर द नेशन अॅण्ड अ पेनी अ डे' अशी इंग्लिश म्हण आहे. जवान राष्ट्रासाठी लढतो आणि पगारासाठी लढतो हे खरेच आहे. राष्ट्र व रोटी ही दोन्ही महत्त्वाची आहेत, पण राष्ट्र हे पहिले पद आहे. जीव पणाला लावावा असे वाटणारे ध्येय आहे. पगार हा दुसरा भाग आहे. पगारासाठी किंवा बोनससाठी जीव पणाला लावला जाऊ शकत नाही. राष्ट्ररक्षणासाठी लावला जातो हे आपण पाहतच आहोत.
 ४.०९ गेली पन्नास वर्षे केवळ रोटीसाठी चेतना जागृती केली गेली. रोटी ही प्रत्येकाला मिळायला हवी, पण केवळ रोटीसाठी कोणी प्राणाहुती देऊ धजत नाही. बोनससाठी जवान लढू शकणार नाही. प्राण पणाला लावण्यासाठी रोटी।बोनस पुरेसे ठरत नाहीत. रोटीचाच विचार करणारे गद्दार पैशांसाठी देशाची गुपिते विकतात, पण बहुसंख्य जवान तसे करत नाहीत, म्हणून देशाच्या सीमा सुरक्षित राहतात. इहवादीच विचार करायचा तर परमवीरचक्रातून दुपारची भूक भागत नाही हे खरेच आहे. आपणच मरून गेलो तर मग त्या चक्राचा आणि पैशांचा तरी उपयोग काय? 'आप मेला जग बुडाला' हा विचार कुणालाही सहज समजतो. लढाईत मेलास तर स्वर्गात जाशील, जिंकलास तर राज्य मिळवशील यांतला स्वर्ग काल्पनिक आहे. मग राज्य राखण्यापेक्षा किंवा कमावण्यापेक्षा कुणाचे तरी मांडलीक झालेले काय वाईट?
 ४.१० भारतीय व्यवस्थापकांनी या मूळ भारतीय विचारपरंपरेतली आत्मा- परमात्म्याची एकजीवता व एकावयवी घडण समजून घेतली तर वरिष्ठ-कनिष्ठ, लहान-मोठा हे स्थानभेद आहेत. सर्व अधिकार हे पदसिद्ध आहेत. त्यांतील समानता त्यांना मनापासून पटेल व ती स्वीकारणे सोपे होईल. मग कनिष्ठाकडून काही चांगली सूचना आली तर ती दाबून ठेवायची बुद्धी होणार नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष होणार नाही. सारे अधिकार, हक्क, साऱ्या जबाबदाऱ्या ह्या वैयक्तिक अहंकार सुखावण्यासाठी नव्हे तर उद्योगाच्या उपयोगासाठी वापरायचे. असतात, ही पुढची पायरी समजायला सोपी होईल. हे सर्वांमधले ‘परम-साम्य' समजणे सोपे होईल.

 ४.११ म्हणून 'स्व'चा शोध स्वतः घ्यायला हवा. आपली दृष्टी सर्व बाह्य उपाधी टाळून आत खेचायला हवी. एकदा श्रद्धेची गोष्ट साधली की मग व्यवस्थापक म्हणून कसे वागायचे, नेतृत्व कसे द्यायचे हे समजणे सोपे होते. स्वतःचा शोध स्वतःच्या विकासाची वाट दाखवू शकतो.

२२ सुरवंटाचे फुलपाखरू