पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वीकार केलेला आहे. त्यांनी पाश्चात्यांकडून सर्व विज्ञान-तंत्रज्ञान घेतले पण व्यवस्थापन तंत्र मात्र स्वतःचे स्वतः विकसित केले. सिंगापूरसारखा देश सामाजिक व्यवहारात व्यक्तीपेक्षा कुटुंबाचे हित प्राधान्यतेने पाहतो. किंबहुना सामाजिक द्वंद्वाऐवजी (adversary culture) सामंजस्य (harmony) ही मोलाची गोष्ट मानणारा तो देश आहे.
 भारताने सर्व कामगार कायदे, न्यायशास्त्र कायदेबाजीत अडकावून ठेवले आहे. आपसातली तडजोड हा विषयच भारतात कमी महत्त्वाचा ठरवला गेला आहे. सामंजस्याऐवजी कोर्टात मिळणाऱ्या न्यायाकडे जाण्याच्या वाटा आपण चोखाळत आहोत. लोकांना ग्राहक संरक्षणात, आरोग्यासारख्या क्षेत्रातसुद्धा कोर्टाकडून मिळणारे भरमसाट निवाडे महत्त्वाचे वाटतात.
 ४.०६ 'क्वॉलिटी सर्कल्स' 'समान युनिफॉर्स' यांसारख्या वरवरच्या देखाव्याच्या गोष्टींचे अनुकरण जपानी व्यवस्थापनाचे अनुकरण म्हणून भारतात करण्याचा प्रयत्न होतो. मी, माझी कंपनी, माझ्या कंपनीत काम करणारे सारे, हे जणू सहोदर आहेत या भावनेने लज्जेने जीव देणारे व्यवस्थापक मात्र भारत निर्माण करू शकत नाही. मुखवट्यांचे अनुकरण सोपे असते. इंग्रजांचा वक्तशीरपणाचा आग्रह, काटेकोरपणा, शरीरश्रमाला कमी न लेखण्याची संस्कृती, कार्यसंस्कृती भारतीय माणूस शिकला नाही. आम्हाला कष्ट करण्याची तयारी, चिवटपणा दोनशे वर्षांत साध्य झाला नाही. जपान्यांचा राष्ट्राभिमानाचा वारसा आम्ही कसा घेणार हा भारतासमोरचा मुख्य प्रश्न आहे.
 ४.०७ मात्सुशिटा (नॅशनल पॅनासॉनिक) या कंपनीचे जे ध्येयवाक्य आहे व प्रार्थनागीत आहे त्यात पहिला मुद्दा 'उद्योगातून राष्ट्रसेवा' असा स्पष्ट नोंदलेला आहे. हा मुद्दा, नफा कमावणारी, अतिशय तडफेने आंतर्राष्ट्रीय बाजारपेठ काबीज करणारी, जगभर उप-कंपन्यांचे जाळे असणारी खासगी मालकीची एक व्यापारी कंपनी महत्त्वाचा मानते व ध्येयाचा पहिला मान 'उद्योगातून राष्ट्रसेवा' या गोष्टीला देते. जास्तीत जास्त नफा, जास्तीत जास्त मार्केट शेअर, जास्तीत जास्त शेअरचा भाव यांना पहिले मानाचे पान देत नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. मोठा ध्येयाने प्रेरित होऊन काम करणारे लोक, त्याच ध्यासाने पछाडलेले त्यांचे व्यवस्थापक नफा, मार्केट शेअर, शेअरचा भाव हे सारे मिळवतातच, पण सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाला पक्का संदर्भ असतो तो, किंवा चौकट असते ती या पहिल्या ध्येयवाक्याची.

 ४.०८ माणसे काम करतात, पेटून-जीव ओतून काम करतात, ती काही भावनिक प्रेरणा असेल तर. नुसत्या गाजर।चाबूक पद्धतीने माणसे भारून जात

सुरवंटाचे फुलपाखरू २१