पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनुयायी जगभर पसरलेले आहेत. ते भारतातही आहेत. पण येथले बहुसंख्य लोक मात्र 'किताबी' नाहीत. भारताची पृथगात्मता त्यात आहे.
 ३.१३ आज पाश्चात्यांसमोरचा जो प्रश्न आहे तो धर्मपंथाची चौकट, किताबाची चौकट, एकाच दर्शनाची चौकट, सार्वकालिक चौकट, अपरिवर्तनीय चौकट न मानण्याच्या विचारावरून निर्माण झालेला आहे. चौकट बदलणारी असली तरी चौकट टाळता येत नाही. बदलणारी चौकटही मूल्यविरहित असू शकत नाही. मूल्ये किंवा त्यांच्याबद्दलचा आग्रह कमीअधिक असू शकेल, दाब कमीजास्त होईल पण काही मूल्ये मानल्याशिवाय सामाजिक जीवन चालू शकत नाही. या धर्मांनी केवळ मूल्यांचा नाही तर त्यांच्या त्यांच्या किताबातले प्रत्येक अक्षर हे अपरिवर्तनीय मानावे असा आग्रह धरला कारण त्यांच्या दृष्टीने तेच परमसत्य आहे. त्यात बदल म्हणजे किताबावर हल्ला मानला गेला. त्यात बदल नाकारला आहे. पूजापद्धति, रीतिरिवाज, आचारविचार हे सर्व किताबांच्या चौकटीत बसवणे आवश्यक बनवले. चर्च, संघटित धर्म या गोष्टींनी साचेबंदपणा, घट्ट चौकटी निर्माण केल्या. पाश्चात्य जगात याविरुद्ध प्रतिक्रिया म्हणून या साऱ्या चौकटी मोडण्यावर भर दिला गेला. चौकट मोडणारेही अर्थातच त्यांची नवी चौकट गृहीत धरत असतात.
 ३.१४ मूळ मूल्यांवरची श्रद्धा कशी वाढवायची याचा विचार स्पष्टपणे माडला गेला नाही. असा सकारात्मक सामाजिक विचार मांडला न गेल्यामुळे व त्याचा प्रसार करण्याची, तो समाजात रुजवण्याची मेहनत कोणीही न केल्यामुळे चंगळवाद, उपभोगवाद यांची चलती आहे. प्रत्येक व्यक्ती तिचा स्वीकार करत आहे. संस्कृतीच्या कल्पनेच्या बांधाची मोडतोड केल्यावर वासनांचे, विकारांचे पाणी आसमंतात प्रलय करणार हे स्वाभाविक आहे.
 ३.१५ पाश्चात्य तत्त्वज्ञही या शाश्वत मूल्यांचा शोध घेत आहेत. भारताकडून त्यात योगदान होईल का याबाबत त्यांचा शोध वैयक्तिक पातळीवर चालू असतो. धार्मिक किंवा खरेतर पांथिक चौकटी, आचारविचार, व्रतेवैकल्ये, कर्मकांड टाळूनही शाश्वत मूल्यांचा विचार होऊ शकतो हे भारताने सिद्ध केलेले आहे. परदेशात त्याचा प्रसार करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे.

 ३.१६ अनेक दर्शने, अनेक तत्त्वज्ञाने, अनेक पूजापद्धती समाजात अस्तित्वात असूनही चिरंतन तत्त्वांचा विचार प्रेषित, पुस्तक यांच्यापलीकडे जाऊन करता येतो ही भारतीय विचारधारेची आधारशीला आहे. याचा विसर पडला असेल किंवा त्याबद्दल अज्ञान असेल तर ते नाहीसे होणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यवस्थापनशास्त्राचा भारतीय मूलाधार शोधणे, मांडणे वा

सुरवंटाचे फुलपाखरू १७