पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय तिसरा


प्राथमिक मूल्यविचार



 ३.०१ मी त्यागाच्या गोष्टी बोलतो तेव्हा या क्षेत्रात त्या भाषेची संवय नसल्यामुळे लोकांना कसनुसे होते. प्रत्येकजण फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतो. गाजराची आशा दाखवूनच गाढवाला चालते करावे लागते. एकतर गाजर दाखवायचे नाहीतर काठी हाणायची हेच काम करायला लावायचे (म्हणजेच व्यवस्थापनाचे) दोन मार्ग आहेत असा साधासरळ हिशेब असतो. हे सर्वमान्य तत्त्वज्ञान आहे किंबहुना हे एकमेव' सत्य आहे असाही काही लोकांचा दावा असतो. वरवर पाहता तो खराही वाटतो. 'सर्वारंभाः तंडुलाप्रस्थमूलाः' असे एक वचन आहे. पण ज्यांनी नवीन उद्योग सुरू केला आहे, नव्या गोष्टी उभ्या केल्या आहेत, 'नूतन काही ते करावे' अशी धारणा बाळगली आहे त्यांचे उत्तर निराळे असते.

 ३.०२ चोरांची किंवा स्मगलरांची टोळी असली तरी तिच्यामध्ये काही मूल्ये मानली जातात. नव्हे मानावी लागतात. त्या टोळीतून फुटणारे, फसवणारे लोक असतात, खबऱ्या तयार होतात. त्यांना टोळीकडून होणारी शिक्षा तशीच टोकाची असते. चोरी किंवा स्मगलिंग यांसारख्या समाजविघातक गोष्टीसुद्धा जेव्हा समूहाने केल्या जातात (आजच्या काळात कोणतीच गोष्ट एकट्याने करता येत नाही) त्यावेळी टोळीशी इमानदारी ही महत्त्वाची गोष्ट मानली जाते. इमानदारीचे मूल्य मोठे मानले जाते. तिथे गद्दारांना क्षमा नसते. कुठल्याही

१२ सुरवंटाचे फुलपाखरू