पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बदलण्याची, स्वतःचे आमूलाग्र परिवर्तन करण्याची आहे. व्यक्तीचे ट्रान्स्फॉर्मेशन न करता समाज सुधारणार नाही. कृतिप्रवण होणार नाही. कामासाठी, काही घडवण्यासाठी चेव निर्माण होणार नाही. स्वतःच्या बदलातून समाजाचे परिवर्तन ही इथल्या विचारांची मूळ गाठ आहे. आमच्या समाजाचा रोख त्यागावर आहे, भोगावर नाही. संन्याशाला या देशात सर्वात जास्त मान मिळतो, कारण तो समाजाकडून कमीत कमी घेतो, कुठे मिंधेपणा निर्माण होऊ देत नाही, एका ठिकाणी राहात नाही. जास्तीत जास्त देतो, भरभरून देतो व कमीत कमी घेतो, म्हणून तो या देशात अग्रमानाचा पुजारी मानला जातो. लोकांच्या मनात आदर आहे तो विवेकानंद, महात्मा गांधी, विनोबा, जयप्रकाश, खान अब्दुल गफारखान आणि त्यांच्या सारख्या विरक्तांबद्दल. लोक त्यांना मानतात व त्यांच्या प्रेरणेने काम करणाऱ्या त्यागी लोकांना लोक मानतात. ते सारे भगवी वस्त्रे घालत होते किंवा घालतात असेही नाही. पण या देशात पूजा फक्त संन्याशाची होते.कारण तो स्वतःचे श्राद्ध स्वतः करून दुसरा जन्म घेत असतो. नवे नाव घेतो. नवे व्यक्तित्व धारण करतो. सर्व जीवांत शिव रूप पाहतो. सर्वांच्या आनंदात स्वतःच्या आनंदाचे समाधान अनुभवतो. म्हणून संन्याशांची नावे आनंद या उपाधीने पुरी होतात. त्यागी माणसाचा शब्द लोक मानतात. देणे ('गिविंग') हीच त्यांची प्रेरणा असते मग ते बाबा आमटे असोत वा सुंदरलाल बहुगुणा. त्यांचे पंथ, त्यांच्या चुका, साऱ्यांच्या पलीकडे त्यांचा प्रभाव असतो. कारण भारतीय मानसिकतेत त्याग हे मोठे मूल्य मानलेले आहे. याउलट, आमच्या आजच्या अर्थविचारात व व्यवस्थापनविचारात त्याग ही चेष्टेची गोष्ट आहे.
 २.११ केवळ बोनसच्या आमिषाने किंवा इन्सेंटिवच्या आमिषाने माणसे काम करत नाहीत, उद्योग उभे राहात नाहीत. सैन्ये लढू शकत नाहीत. केवळ भोगाच्या लोभाने चेव निर्माण होत नाही. काम करायला प्रेरणा देणारे आवाहन भावनिक अस्तराने जोडलेले असावे लागते. उत्पादकतेसंबंधीची किंवा मूल्यवर्धनाची ही भावना कशी निर्माण करायची ह्यात साऱ्या व्यवस्थापनाच्या प्रश्नांची गुरुकिल्ली आहे. लोकांसमोर मोठी स्वप्ने ठेवली तर सामान्य लोक असामान्य गोष्टी घडवू शकतात. प्रतिकूल परिस्थितीत काम करणारी माणसे कारखाने सोडून जात नाहीत, पण बरेचसे व्यवस्थापक मात्र जातात असा अनुभव आहे. बऱ्याच कारखानदारांनी या अनुभवाबद्दल लिहिलेलेही आहे.

 २.१२ माझ्या लेखनाचा उद्देशच या, जे प्रत्यक्ष काम करणारे व्यवस्थापक, कामगार व कर्मचारी आहेत त्यांनी या संकल्पनांचा आपल्या व्यवहारात वापर करावा व त्याचा परिणाम होतो किंवा नाही याची नोंद घ्यावी त्याला प्रसिद्धी

१० सुरवंटाचे फुलपाखरू