पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 २.०७ भारतात मात्र इंग्लिश शिकलेले लोक मूळ मातीशी नाळ तोडून विचार करत आले. भारतातला हा अभिजनांचा वर्ग आहे. ही माणसे इंग्लिश परंपरेचा अभ्यास असलेल्या पण मूळ मातीशी नाते राखलेल्या विवेकानंद, रवींद्रनाथ, गांधी आणि अरविंदांना विसरली. या लोकांनी जी स्वत्वजागृती केली होती ती विसरली. पाश्चात्य देशांतल्या विज्ञानाबरोबर पाश्चात्य देशांतली आर्थिक तत्त्वज्ञाने स्वीकारल्यामुळे या देशातल्या भूमिपुत्रांना ती हलवू शकली नाहीत. त्यांच्यात प्रेरणा व चेव निर्माण करू शकली नाहीत. अभिजन जे जे भारतीय ते ते टाकाऊ, जे जे स्वदेशी ते ते कमी दर्जाचे अशा कल्पनेने वावरत आले.
 २.०८ 'आत्मार्थे पृथिवीं त्यजेत' या कोटीची ज्या देशाची व्यक्तीच्या वैचारिक स्वातंत्र्याची कल्पना त्या देशात स्टॅलिनिस्ट केंद्रीकरणाची अंमलबजावणी करण्याची या मंडळींनी शर्थ केली. माणसे म्हणजे जणू छापातले ठोकळे किंवा यंत्रातले खिळेमोळे अशासारख्या कल्पना गृहीत धरून मांडणी केली. माणसांची फक्त आर्थिक जीव अशी एकांगी व्याख्या धरून साया योजना मांडल्या. पैशांच्या आमिषाशिवाय दुसऱ्या प्रेरणा असतात ही कल्पनाच बाद ठरवली. चेतना जागृतीच्या नावावर हक्क (राइटस्) यांचा आक्रोश करायला शिकवले. कर्तव्याचा ओझरता उल्लेखही केला नाही.
 २.०१ पाश्चात्यांच्या समाजधारणेच्या कल्पना श्रेष्ठ, कारण त्यांचे विज्ञान श्रेष्ठ, त्यांचे तंत्रज्ञान श्रेष्ठ अशी सोयिस्कर समजूत पसरवण्याचा प्रयोग झाला. सोय अशी होती, की जेत्यांनी हे सारे इंग्लिश भाषेत त्यांच्या साम्राज्याच्या सोयीसाठी आधीच लिहून तयार ठेवले होते. चष्मा तयार होता.आमच्या अभिजनवर्गाने तो वापरायला सुरुवात केली आणि मग त्यांना सारे तसेच दिसू लागले नसते तरच नवल. पाश्चात्यांचा प्रयत्नवाद, ज्ञानसाधनेची तळमळ, ख्रिश्चन धर्मपंथातली करुणा हे गुण आम्ही आत्मसात केले नाही. घेतला फक्त त्यांचा वरवरचा भोगवाद. आम्ही साधी वेळ पाळण्याची गोष्ट किंवा शारीरिक श्रमांबद्दलची आदरभावना शिकू शकलो नाही. आम्ही त्यांचे दुर्गुण घेऊन त्यांच्याशी स्पर्धा कशी करू शकणार आहोत? आम्हाला त्यांचे ज्ञान हवे, विज्ञान हवे, तंत्रज्ञान हवे, पण आमचा मानव्याचा सर्व सजीवांपर्यंत पोचणारा व्यापक विचार, समाजधारणेचा विचार हा मात्र या परंपरेशी अभिन्न नाते जपणारा हवा. आमच्या मूळच्या दार्शनिक विचारांशी प्रामाणिक हवा. पूर्ण स्वदेशी हवा.

 २.१० भारतीय परंपरेचा मूळ पाया नाकारून या देशात तुम्ही काही उभारू शकणार नाही. आमची मूळ प्रेरणा स्पष्टपणे आत्मशोधाची आहे, स्वतःला

सुरवंटाचे फुलपाखरू ९