पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अभियांत्रिकीत तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही."
 २.०५ एकदा सर्वव्यापी ब्रह्माचे किंवा ईश्वराचे अस्तित्व मानले, की मग ही सारी माणसे एकाच ईश्वराची लेकरे म्हणजे आपण सारी माणसे भावंडेच आहोत हे समजावणे सोपे होते. परमात्म्याचा अंश प्रत्येकात आहे हे सांगणे सोपे जाते. ही सारी गृहीतके जेव्हा श्रद्धेने, भावनेने स्वीकारली जातात तेव्हा तशा श्रद्धेच्या लोकांना कृती करण्यासाठी प्रोत्साहित करता येते. स्वतःच्या श्रद्धा काय आहेत याचा विचार उपयुक्त ठरतो. मोठी कामे घडवण्यासाठी नुसती शक्ती किंवा क्षमता पुरेशी ठरत नाही तर माणसाच्या भावनांना, मनाला जागे करावे लागते. तेव्हाच मोठी कामे होतात, मोठ्या गोष्टी घडतात. बहिणाबाईने म्हटले आहे, "ज्याच्यामधी नाही भाव, त्याले भक्ती म्हनू नही, ज्याच्यामधी नाही चेव त्याले शक्ती म्हनू नही." काम करणाऱ्या माणसांच्या मनात हा चेव कसा निर्माण करायचा हा व्यवस्थापन शास्त्रासमोरचा मूळ प्रश्न आहे. तो सुटला तर बाकीचे तिढे सुटतात. तो नसला आणि सारी सामग्री, यंत्रे, संपत्ती, सोयी असल्या तरी त्यातून काही मोठी कामे होत नाहीत. काही सकारात्मक घडत नाही.

 २.०६ दुसऱ्या महायुद्धात राखरांगोळी झालेला जपान त्यावेळच्या विजेत्या अमेरिकेला त्यांच्याच बाजारपेठेत वरचढ कसा ठरला त्याचे कारण समजावून घ्यायला हवे. अमेरिकन मोटारी, अमेरिकन कॅमेरे, टीव्ही, रेडियो, गृहोपयोगी वस्तू त्यांच्या स्वतःच्या देशात परदेशी जपानी वस्तूंशी स्पर्धा करू शकत नाहीत! जपानी व्यवस्थापनतंत्र म्हणजे काही गूढ गोष्ट नाही. प्रख्यात जपानी व्यवस्थापनतज्ज्ञ ओऽहमी तर असे म्हणतात, की व्यवस्थापनाच्या ज्या कल्पना जपानी कारखानदारांनी वापरल्या त्या साऱ्या अमेरिकन पुस्तकांत लिहिलेल्या आहेत. जपानी लोकांनी त्यांच्या प्रादेशिक, राष्ट्रीय भावनांना अनुरूप त्यांचा वापर केला. जपानची गणना आर्थिक महाशक्ती म्हणून होते. त्यांनी व्यवस्थापनाच्या अमेरिकन कल्पना अंमलात आणताना जपानी लोकांमधला राष्ट्रीय अभिमान, त्यांची समूहाने कामे करण्याची परंपरा व वैशिष्ट्ये वापरल्या. त्या कल्पना पचवून त्यांनी त्यांना जपानी रूप दिले. त्या कल्पना आत्मसात केल्या. पाश्चात्य देशांत विकसित झालेले विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनं यांचा वापर करून त्यांनी जगभर आपला व्यापार वाढवला. ह्या साऱ्या गोष्टी १९५० सालानंतर घडलेल्या आहेत, म्हणजेच भारताला ब्रिटिश सत्तेपासून राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या व माझ्या कार्यकालीन कालखंडातल्या म्हणजे १९६० ते २००० या वर्षांतल्या आहेत.

८ सुरवंटाचे फुलपाखरू